Breaking News

लॉकडाऊन पाळू नका, सर्व दुकाने उघडा!

लॉकडाऊन पाळू नका, सर्व दुकाने उघडा!

- सरकारच्या निर्णयाविरोधात प्रकाश आंबेडकर यांचे असहकार आंदोलन
- माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा, मी घाबरत नाही - आंबेडकर
मुंबई / प्रतिनिधी :
सर्वांनी दुकाने, टपर्‍या टायपिंग इन्स्टिट्यूट उघडा तसेच रिक्षावाल्यांनीसुद्धा फिरायला सुरू करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. औंरगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जे लॉकडाऊन आले त्याला मान्य करू नका. लॉकडाऊनच्या सूचना मान्य न करता आधीसारखेच जीवन सुरू करा, असेदेखील आंबेडकर म्हणाले.
आमचा लॉकडाऊनला पाठिंबा नाही हे दर्शवण्यासाठी ज्या झेंड्याला तुम्ही मानत असाल तो झेंडा लोकांनी घरी, गच्चीवर फडकवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. तिरंगा फडकवलात तर अधिक चांगले होईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. असे आवाहन केल्याने माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा, मी घाबरत नाही, असेही त्यांनी राज्य व केंद्र सरकारला नीक्षून सांगितले. जे हाल परराज्यातील कामगारांचे झाले तेच हाल लहान लहान उद्योजकांचे होत आहेत. लोकांची उपासमारीची परिस्थिती आली आहे. ८० कोटी कुटुंबांना अन्नधान देऊ म्हणले होते मात्र ते वाटलेले काही दिसत नाही. कोरोनासंदर्भात सत्यस्थिती मांडायला राज्य किंवा केंद्र शासनाकडे राजकीय हिम्मत आणि नेतृत्व नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी याप्रसंगी केली. भूकबळी आणि इतर आजारामुळे लोक मरत आहेत. हे लॉकडाऊन चक्रामध्ये दोन्ही शासन स्वतःहून अडकलेत. बाहेर पडण्याचा रास्ता त्यांना दिसत नाही. सर्वसामान्य जनतेनेच शासनाला रास्ता दाखवण्याची गरज आहे. ३ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले आहे.
---------------------------