Breaking News

आंबेडकरांच्या आंदोलनापुढे सरकार झुकले!

मंदिरे उघडणार; आठ दिवसांत नियमावली!

- पंढरपुरात प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन यशस्वी

- मंदिरे खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

- आंबेडकरांना विठ्ठलदर्शन : आंबेडकरांसाठी विठ्ठल मंदीर उघडले

Image

पंढरपूर/ खास प्रतिनिधी

लवकरात लवकर लोकांसाठी मंदिर, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिरे उघडली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरे सुरु होतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मंदिरे उघडावीत यासाठी सोमवारी विश्‍व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात तीव्र आंदोलन केले. हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले. बंद असलेले विठ्ठलाचे मंदीर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी उघडण्यात आले व त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. जोरदार आंदोलनामुळे पंढरपुरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी दर्शन घेतले. 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आले. मंदिरे खुली करण्याबाबत  मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आपण आठ दिवस थांबू, वारकर्‍यांच्या आंदोलनाला यश आले असे आपण समजूया, लोकभावनेचा आदर केला त्याबद्दल सरकारचे आभार, असेही याप्रसंगी आंबेडकर यांनी सांगितले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात 450 पोलिस तैनात करण्यात आले होते. तर शहरात येण्यासाठी वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तरीही हजारो कार्यकर्ते व वारकरी विठ्ठल-रुख्मिनी मंदीरावर धडकले होते. प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल दीड तास जिल्हाधिकारी यांची वाट पाहिली पण ते आले नाहीत. त्यानंतर आंबेडकर हे आंदोलनासाठी रवाना झाले होते. आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय!

आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, असे विधान पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. सरकारने सुरुवातीलाच वारकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आंदोलनाची वेळ आली नसती. संजय राऊत यांनी आजच्या आंदोलनावर केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण नाही. लोकशाहीत सरकारने कृती केली नाही की, जनता ती करते, असेही आंबेडकर म्हणाले.  आंदोलन पेटण्याची शक्यता पाहाता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोबाईलवरून संपर्क साधून आंबेडकरांना मंदिरे उघडण्याचे आश्‍वासन दिले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. 


खा. संजय राऊत यांची आंबेडकरांवर टीका

आम्ही नियम मोडण्यासाठी आलेलो आहेत. असे म्हटले जात आहे. प्रकाश आंबेडकर हे एक संयमी नेते आहे. ते कायद्याचे अभ्यासक आणि जानकार आहेत. ज्यांनी या देशाला कायदा आणि घटना दिली. त्यांचे ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून आरोग्यविषयक आणीबाणी असताना कायदे भंगाची किंवा नियम भंगाची भाषा करणे हे म्हणजे लोकांना उचकवण्यासारखे आहे. तरी मला खात्री आहे. यावर मुख्यमंत्री आणि विरोधक मार्ग काढतील, अशी टीका या आंदोलनावर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केली होती.