Breaking News

अग्रलेख - काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल हवाच!

 अग्रलेख - काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल हवाच!

अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी कायम करण्यात आलेल्या श्रीमती सोनिया गांधी या काँग्रेसच्या १३० वर्षांच्या इतिहासातील सर्वांत दीर्घकालीन अध्यक्ष ठरल्या आहेत. पक्षात निवडणूक प्रक्रिया कशी सोयीने वापरली जाते हे त्यांच्या १९९८ मध्ये पक्षाध्यक्षपदी झालेल्या निवडीतून दिसून आले होते. आणि, आताही पक्षाचे अध्यक्षपद स्वतःच्या घराबाहेर कसे जाणार नाही, याची काळजी त्यांनी घेतल्याचे दिसून आले. खरे तर आम्हाला दिसते त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाची शकले उडाली आहेत. काँग्रेसमधील नेतृत्वाबाबतच्या वादामुळे पक्षाचे सरळसरळ विभाजन झालेले दिसत आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाच्या हंगामी स्वरूपाबद्दल नाराजी व्यक्त केली होती, तर बहुतेक राज्यस्तरीय नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा जाहीर केला होता. यात आणखी एक वर्गही आहे. या वर्गाने आपली प्राधान्ये स्पष्ट करण्यापूर्वी परिस्थितीचा पूर्ण अंदाज घेण्याची धोरण अवलंबलेले दिसते. तर सोनिया गांधी यांनी आपण नक्कीच राजीनामा देऊ आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून आपला वारस निवडण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकारी समितीवर (सीडब्ल्यूसी) सोपवू असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता पक्षांतर्गत निवडणुका अटळ वाटत असल्या तरी तसे होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. काँग्रेस ही गांधी घराण्याची कौटुंबीक मालमत्ता ठरावी, असे दरबारी राजकारण सद्या नवी दिल्लीत जोरदार शिजायला लागलेले आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासंदर्भातील सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची सात तासांची बैठक अत्यंत वादळी झाली. दिवसभर काँग्रेसमधील विसंवाद ट्विटरच्या माध्यमातून बाहेर येत होते. वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले व नंतर ते मागे घेण्यात आले. अखेर पुढील सहा महिने काँग्रेस पक्ष आपला अध्यक्ष निवडेपर्यंत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीच काम पाहतील यावर एकमत झाले. नव्या अध्यक्ष निवडीची बैठक लवकरच बोलावण्यात येईल व ती सहा महिन्याच्या आता बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सोनिया गांधी यांनी पक्षाचे संघटन अधिक मजबूत व त्यात परिवर्तन आणण्यासाठी व नवा अध्यक्ष निवडीपर्यंत पक्षाचे अध्यक्षपद सांभाळावे, असे कार्यकारिणीचे मत बनले. कार्यकारिणीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर आपला विश्वास केला आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होण्याआधीच सोनिया गांधी यांनी आपले अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी नवा अध्यक्ष शोधण्याचे काम पक्षाने सुरू करावे, असे सांगितले. त्यावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व अन्य नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदावर राहण्याचा आग्रह केला. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद व अन्य नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा मुद्दा सोनिया गांधी यांनी या बैठकीत उपस्थित केला. सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या नेत्यांवर राहुल गांधी यांनी निशाणा साधला. राजस्थान व मध्य प्रदेशात पक्ष ताकदीने लढत असताना व त्यादरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसताना असे पत्र का लिहिले गेले, हा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. कार्यकारिणीची बैठक सुरू झाल्यानंतर तासाभरातच सोनियांना पत्र लिहिणार्‍यांचे भाजपशी संधान आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केल्याचे वृत्त बाहेर आले व त्यावर कपिल सिब्बल यांनी ट्विटरवर आपण काँग्रेससाठी गेली ३० वर्षे काम केले असे प्रत्युत्तर दिले. राजस्थानच्या पेचप्रसंगात काँग्रेसला हायकोर्टातून विजय मिळवून दिल्याचा व आपल्या आयुष्यात भाजपला कुठे समर्थन केले आहे, असा प्रतिप्रश्न व उद्विग्नता व्यक्त केली. पण बराच गदारोळ झाल्यानंतर असे विधान राहुल गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केलेच नाही, असे पक्षप्रवक्ते सुरजेवाला यांनी स्पष्ट केल्याने सिब्बल यांनी आपले ट्विट मागे घेतले. नंतर सिब्बल यांनी राहुल गांधी यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व आपण असे काहीच बोललो नसल्याचे स्पष्ट केले, अशा मजकुराचे दुसरे ट्विट केल्यानंतर हे वादळ शमले. या गदारोळात गुलाम नबी आझाद यांच्यावरही राहुल गांधी नाराज असल्याचे वृत्त पसरले. पण नंतर आझाद यांनी असे काहीच घडले नसल्याचे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांतील एक गट चुकीचे अर्थ लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. खरे तर २३ नेत्यांच्या पत्रात काय होते? गेले सहा वर्षांत दोन लोकसभा व अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षामध्ये परिवर्तन आणावे, पक्षाची मजबूत बांधणी करावी, जबाबदारीत्व द्यावे, नियुक्त प्रक्रियेला मजबूत करावे व पराभवाचे वस्तुनिष्ठ आकलन करावे अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या पक्षहिताच्या होत्या. या पत्रात पक्षात वरून खालीपर्यंत सर्व स्तरांवर बदल करावेत, देशातील तरुण वर्ग मोदींना मतदान करत आहे, या वर्गाशी काँग्रेस संवाद साधू शकत नाही. देशातील काँग्रेसचा जनाधार वेगाने कमी होत आहे असे मुद्दे मांडण्यात आले होते. हे मुद्दे तर वास्तवाला धरूनच आहेत. राहुल गांधी हे देशाच्या तरुणांमध्ये आपली ओळख निर्माण करू शकले नाहीत. आपली लोकप्रियता प्रस्थापित करू शकले नाहीत. त्यामुळे पक्षाला आता कात टाकणे गरजेचे आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन हे देशासाठी अनिवार्य असून, ते लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी यांच्यारुपाने देशासमोर आज गंभीर संकट उभे आहे. मोदींचे नेतृत्व म्हणजे, देशापुढे भय, असुरक्षितता, बेरोजगारी, महासाथीमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, सीमा संरक्षण, वाढती धर्मांधता असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी काँग्रेसला आपल्या रचनेत आतून परिवर्तन व बदल करावे लागणार आहे. त्यासाठी सत्तेतील विकेंद्रीकरण, प्रत्येक राज्यातील काँग्रेस पक्षाला सशक्त करणे यावर पक्षाला काम करावे लागणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षात सर्व पातळीवर निवडणुका आवश्यक असून, पक्षाच्या संसदीय मंडळाचीही तत्काळ स्थापना करणे गरजेचे आहे. नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा मसुदा हाच होता. तरीही ते पत्र राहुल गांधा यांना टोचले. त्यातून त्यांची अपरिपक्वताच दिसून आली. काँग्रेस नेतृत्वाबद्दल असलेली अनिश्चितता, पक्षातील अंतर्गत संघर्ष यामुळे सामान्य कार्यकर्ता पक्षावर नाराज आहे. काँग्रेस ज्या समस्येने ग्रासलेली आहे ती समस्या खरे तर पक्षाच्या नेतृत्वात बदल करून सुटेलच असे नाही. खर्‍याअर्थाने लोकशाही आणायची असेल, तर काँग्रेसला आपली घटना जिवंत करावी लागेल. याचा अर्थ सर्वप्रथम कार्यात्मक व शक्तिशाली एआयसीसी निवडून आणली पाहिजे. सीडब्ल्यूसी विसर्जित करण्याचे अधिकार केवळ एआयसीसीला आहेत. एआयसीसीच्या हातात अधिकार आल्यामुळे सीडब्ल्यूसीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. काँग्रेस संसदीय मंडळी, पीसीसी, जिल्हा समित्या आदी संस्थांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. तरच सीडब्ल्यूसी खर्‍याअर्थाने पक्षकार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करू शकेल. ही मोठी जबाबदारी घेण्याची तयारी एखाद्या कंपूची आहे का? सध्याच्या वादाची निष्पत्ती काहीही झाली, तरी काँग्रेसपुढे उभा ठाकलेला हा प्रमुख प्रश्न आहे. नेतृत्व म्हणून आता सोनिया किंवा राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केल्यापेक्षा नवीन तरुण नेतृत्व शोधणेच अधिक योग्य ठरेल.
-----------------------