Breaking News

वर्षाअखेरपर्यंत मिळणार कोरोनावरील लस

- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली गूड न्यूज


नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

भारताची कोरोना लस ह्युमन ट्रायलच्या तिसर्‍या टप्प्यात असून, या लशीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. आता अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही लस कधी मिळणार याची माहिती दिली आहे. या वर्षाअखेरपर्यंतच मेड इन इंडिया कोरोना लस उपलब्ध होईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतातील कोरोना लशीबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, जगभरात कोरोना लशीचे ट्रायल फास्ट ट्रॅक केले जात आहे. भारतातील लशींचे ट्रायल 2020 वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. 2021 च्या पहिल्या तिमाही लशीचा वापर करण्यासाठी आपण तयार असू शकतो. भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने करार केला आहे. त्यामुळे ही लस यशस्वी झाली तर भारताला स्वस्त दरात हे औषध उपलब्ध करून दिले जाईल. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आधीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीचे उत्पादन करत आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेत ही लस बाजारात उपलब्ध करून देता येईल. भारत बायोटेकप्रमाणे सीरम इन्स्टिट्युसहदेखील असाच करार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असेही ते म्हणाले. लशी बाजारात आणण्यासाठी कमीत कमी एक महिना आणखी लागेल. लस उपलब्ध होताच सर्वात आधी आरोग्य कर्मचार्‍यांना दिली जाईल, त्यानंतर वयस्कर व्यक्त आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना दिली जाईल. त्यानंतर उपलब्ध डोसनुसार सर्वांचे लसीकरण केले जाईल, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाखांवर!

केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे, तर 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत  68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या 20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती. गेल्या 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे.