Breaking News

कर्जाचा व्याजदर कमी करण्यास "अभ्यासगट" म्हणजे पोरकटपणा —सदिच्छा मंडळ

कर्जाचा व्याजदर कमी करण्यास "अभ्यासगट" म्हणजे पोरकटपणा —सदिच्छा मंडळ
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जाचा व्याजदर कमी करावा यासाठी "सदिच्छा मंडळाने" रान ऊठवल्यानंतर जिल्हाभरातुन बारा हजार सभासदांकडुन कर्जाचा व्याजदर कमी करण्याची मागणी जोर धरु लागताच, बँक संचालक मंडळ व गुरुमाऊली मंडळाने व्याजदर ठरवण्यासाठी अभ्यासगट नेमल्याची पोकळ घोषणा करुन "पोरकटपणा" सिद्ध केल्याची टीका सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी केली आहे.
        मागील निवडणुकीत सत्तेत येतांना गुरुमाऊली मंडळाने सभासदांना दिलेल्या वचननाम्यात वचन क्रं-६ हे"महत्वाचे निर्णय आमसभेत घेऊ" असे होते.कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी अभ्यासगट नेमला ,मग घड्याळांची खरेदी करतांना आमसभा वा अभ्यासगट का नाही? तसेच नेवासा शाखा फक्त दुरुस्तीत सुमारे २३ लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च दाखवली,कर्मचार्‍यांना रजा पगार देणे, कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग देत आयोगाचा मागील सर्व फरक एकाच वेळेस देत त्यावर हात मारणे,संचालक प्रवास भत्यात वीसपट वाढ,सुरक्षारक्षकांच्या नावाखाली दरमहा हजारो रुपयांची लुट,कर्मचारी गणवेश खरेदी,कायम ठेव दरमहा हप्त्यात भरमसाठ वाढ करणे, या व इतर आर्थिक लाभाच्या अनेक गोष्टी करतांना "अभ्यास गट का नेमला नाही? असा सवाल सदिच्छा मंडळाचे गजानन ढवळे,बाळासाहेब साळुंके,गोकुळ कळमकर, बाळासाहेब खिलारी,राजु कुदनर,अशोक आवारी,पांडुरंग काळे,बाळकृष्ण कंठाळी,रामदास दहिफळे,सुरेश खेडकर,रामदास गव्हाणे,हरिश्चंद्र बडे ,गौतम साळवे आदींनी केला आहे! जुलै 2020 मध्ये शेवटच्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळ बैठकीत व्याजदर कमी करण्याचा ठराव पास होईल ही भाबडी आशा सभासदांनी बाळगली होती,पण संचालक मंडळाने त्यास केराची टोपली दाखवली.निवडणुक दोन/तीन महिने राहिल्यावर थोडा व्याजदर कमी करुन सभासदांची चेष्टा करतील अशी कोपरखेळी सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र पिंपळे यांनी मारली.
          मुदत ठेव पावतीचा व्याजदर ७.२५ टक्के  केला, रिकरिंगचा व्याजदर ६.२५ टक्के  केला, याला अभ्यासगट लागला नाही मग कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी अभ्यासगट म्हणजे निव्वळ पोरकटपणा असुन ,विद्यमान संचालक मंडळ बँक चालवण्यासाठी सक्षम नसुन त्यांना अभ्यासगटाच्या"कुबड्यांची गरज पडते,त्या पेक्षा खुर्च्या खाली करुन निवडणुकीला सामोरे जा असा इशारा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी दिला आहे.  अभ्यासगटाच्या नावाखाली वेळकाढुपणा करुन सभासदांचे कर्जव्याजदरातुन शोषण करणार्‍यांना सभासद येत्या निवडणुकीत कायमचे हद्दपार करतील  असे नारायण राऊत ,नवनाथ काळे,रमेश निकम यांनी सांगीतले