Breaking News

२०२० हे वर्ष नावाप्रमाणे ट्वेंटी ट्वेंटी नसून कोरोना मुळे कसोटीचे वर्ष : पो.अधिक्षक मोक्षदा पाटील !

२०२० हे वर्ष नावाप्रमाणे ट्वेंटी ट्वेंटी नसून कोरोना मुळे कसोटीचे वर्ष : पो.अधिक्षक मोक्षदा पाटील !
गंगापूर प्रतिनिधी :
       बुधवार  रोजी दुपारी ११ वाजता गंगापूर येथील शिवकृपा मंगल कार्यालयात गणपती उत्सव व मोहरम निमित्त  औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी २०२० हे वर्ष नावाने जरी ट्वेंटी ट्वेंटी वाटत असले तरी तसे नसून कोरोना मुळे सर्वांसाठी कसोटीचे आहे. कोरोना ला हरवायचे असेल तर  सण व उत्सव साजरे करताना कोरोना बाबत सर्व नियम पाळणे गरजेचे आहे कोरोना होणारा व्यक्ती म्हणजे आरोपी नाही त्यामुळे कोरोना बाधितांशी सुरक्षित अंतर ठेवून माणुसकीने वागा. कोरोनाचा प्रादुर्भाव  काही काळ सुरूच राहणार आहे त्या मुळे सर्वांनी सण उत्सव साजरे करताना सोशल डिस्टन्सिंग सह नियमांचे पालन करावे जे नियम मोडतील त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे म्हटले.
      या वेळी तहसीलदार अविनाश शिंगटे, उपविभागीय पोलिस आधिकारी संदीप गावीत, नगराध्यक्षा वंदना पाटील, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, शिल्लेगांव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर, पो उ. नि. अर्जुन चौधर, गृहरक्षक दल समादेशक चंद्रशेखर पाटील ,नगरसेवक भाग्येश गंगवाल, प्रदीप  पाटील, यांच्या प्रमुख उपस्थिती सह तालुक्यातील पोलिस पाटील , गणेश मंडळांचे अध्यक्ष , मौलाना, उपस्थित होते.
तहसीलदार अविनाश शिंगटे म्हणाले की सर्वांनी आतापर्यंत सर्व सण साधे पणाने साजरे करुन कोरोनाच्या आजारावर मात केली आहे, कोरोना ची साखळी तोडण्यासाठी येणारे गणेशोत्सव, मोहरम सण शासनाच्या आदेशानुसार साजरे करावेत.
या वेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते विविध ठिकाणी सामाजिक कार्यात सहभाग घेणाऱ्या तरुणांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. शहरवासीयांनी देखील पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या कार्यपद्धतीचा सन्मान म्हणून जागतिक फोटोग्राफर दिनाचे औचित्य साधून 'फोटो पे फोटो' संकल्पनेतून साकारलेले त्यांचे छायाचित्र भेट दिले.
    कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी केले तर पो उ नि अर्जुन चौधर यांनी आभार मानले.

तालुक्यातील बव्हंशी गणेश मंडळांनी या वर्षी सार्वजनिक गणपती न बसवण्याचे मान्य केले आहे. गंगापूर येथील  भाग्येश गंगवाल मित्र मंडळाने गणेशोत्सव रद्द करुन त्याऐवजी ती रक्कम कोविड सेंटर साठी देण्याचे ठरवले त्यानुसार नगरसेवक भाग्येश गंगवाल यांनी ५१ हजार रुपयांचा चेक  पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील व तहसिलदार अविनाश शिंगटे यांचेकडे सुपुर्द केला. या कौतुकास्पद निर्णयाबद्दल पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंगवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.