Breaking News

प्रशासन लॉकडाऊन करणार नाही, लोकांनी स्वत: लॉक व्हावे!- जिल्हाधिकार्‍यांनी केले आवाहन

प्रशासन लॉकडाऊन करणार नाही, लोकांनी स्वत: लॉक व्हावे!- जिल्हाधिकार्‍यांनी केले आवाहन
- जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक
अहमदनगर/ प्रतिनिधी
जिल्हा प्रशासन आता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करणार नाही. प्रत्येक जण प्रशासनावरच जबाबदारी ढकलण्याची वृत्ती दिसून येते. लोकांनी स्वत:हून लॉक करून घेतले, तर कोरोनाचा संसर्ग समाजात पसरणार नाही. लोकांनी नियम पाळावेत, लवकरच रुग्णवाढीचा दर कमी होईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुकपेजवरून द्विवेदी यांनी रविवारी सकाळी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकांनी गर्दी टाळावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. आजही अनेक लोक बेफिकीरपणे वागत आहेत. अनेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पालन केले तर कोरोना वाढणार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी चर्चा आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत नाही तर ते प्रशासन शोधत आहे. संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने चाचणी संख्या वाढविली आहे. या चाचण्या म्हणजे रुग्णांचा शोध आहे. त्यामुळे नागरिकांनी भिती बाळगण्याची गरज नाही. करोना आता सगळीकडेच पसरला आहे. लोकांनीच आता जपून वागले पाहिजे. मास्क अनिवार्य आहे. प्रत्येकाला वाटते की प्रशासनाने लॉकडाऊन केला पाहिजे. मात्र लोकांनी स्वत:हून आपल्या इमारती, सोसायटी लॉक करावी. पंधरा दिवस कोणीही सोसायटीच्या बाहेर जाऊ नये. अशी दक्षता घेतली तर कोरोनाची साखळी कमी करता येतील. सध्या दोन हजारपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या जात आहेत. त्याची संख्या आणखी वाढविणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करीत आहे, नागरिकांनी काय केले पाहिजे, याबाबत द्विवेदी यांनी सविस्तरपणे सांगितले. चाचणी वाढविल्यामुळे समाजात होणारा संसर्ग कमी झाला आहे. अनेक लोक स्वत:हुन तपासणी करण्यासाठी येत नाहीत. चाचण्या वाढवल्यामुळे उपचार करणे व समाजापासून विभक्त करणे त्याला लगेच शक्य होते. यामुळे धोका कमी होत असल्याने लोकांनी स्वत:हून क्वारंटाईन झाले पाहिजे. क्रिटीकल स्टेजमध्ये आल्यानंतर उपचार करणे अशक्य होते. अद्याप कोणतेही व्हॅक्सिन तयार झालेले नसल्याने लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मृत्यू दुर्दैवी आहे. पण लोकांनी लक्षणे आढळल्यास व प्रकृती चिंताजनक होण्याआधीच दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
-----
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजार पार
जिल्ह्यात शनिवारी व रविवारी कोरोना बाधित रुग्णवाढीचा उच्चांक झाला. काल एकाच दिवशी ५३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ५०८ झाली आहे. तर शनिवारी आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
------------------------------