Breaking News

कोपरगाव तहसिल आवारातुन कार्येकर्त्यांनी पकडुन दिलेली तांदूळाची गाडी पळवली !

कोपरगाव तहसिल आवारातुन कार्येकर्त्यांनी पकडुन दिलेली तांदूळाची गाडी पळवली

( रेशनच्या तांदूळाची अवैध विक्री करत असल्याचा मनसेचा आरोप )

 [ तो तांदूळ काळ्याबाजारातच चालला होता का ?, तो तांदूळ कोणाचा होता ?, गेला कुठे?, त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही ?, आता त्यांच्यावर कारवाई होणार का ?, कोण करणार कारवाई ?, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे.]


कोपरगाव / लक्ष्मण वावरे
  कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या जवळ एक अशोक लँलंड कंपनीची मालवाहतूक गाडीत असलेला तांदूळ हा रेशनचा असून त्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून सदर गाडी कोपरगाव येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली मात्र दोन ते तीन तासानंतर सदर तांदूळाच्या गोन्यांनी भरलेली गाडी व  चालक चक्क तहसील आवारातून गायब झाली असून आज  दोन दिवस झाले तरी याबाबत कुठलीही तक्रार दाखल न झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
    सदरचे सविस्तर वृत्त असे की,  मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा  वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका जवळ चारचाकी अशोक लँलंड कंपनीच्या गाडी क्रमांक  एम एच १७ बी वाय ६००१ या चारचाकी वाहनातून तांदळाने भरलेल्या गोण्याची वाहतूक होत असताना सदर तांदूळ हा रेशनचा असून त्याची अवैधपणे विक्री होत असल्याच्या संशयातून कोपरगाव येथील मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल , तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी ही तांदळाची गाडी अडवून त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली त्यांनी पाहणी करून त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. त्यानंतर मनसे सैनिकांनी ही गाडी चालकासह तहसील कार्यालया समोरील प्रांगणात लावली व याबाबत तहसीलदार यांच्याशी फोनवर बोलून हकीकत सांगितली तहसीलदार योगेश चंद्रे हे मिटिंग मध्ये असल्या कारणाने त्यांना येण्यास विलंब झाला त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी वेळ अधिक झाल्या मुळे तेथील कर्मचाऱ्यांना  सांगून तेथून निघून गेले.  मिटिंग संपल्यावर तहसीलदारांनी  याबाबत मनसे कार्यकर्त्यांना फोन करून बोलावून घेतले व त्यांच्याशी चर्चा केली  मात्र तो पर्यंत सदर तांदूळ गोण्या भरलेली गाडीही तेथून पळविण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच तहसीलदार व मनसे पदाधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यात सदर गाडीचालक व अन्य 2 इसम त्यासोबत हालचाल करताना आढळून आले. व त्या चालकाने गाडी घेऊन धूम ठोकल्याचे पहावयास मिळाले. 
    हा सर्व प्रकार मंगळवारी दिवसभर घडला मात्र आता या गदारोळा नंतर 2 दिवस उलटत आले तरी गुन्हा दाखल झाला नव्हता . 
या प्रकरणी आता तरी गुन्हा दाखल होणार का? सदर गुन्हा दाखल करण्यास कोण पुढे येणार ? गाडी मधील तांदूळ जर रेशनचा नसेल तर चालकाने तेथून गाडी घेऊन धूम का ठोकली? गाडी नेताना सी सी टी व्ही फुटेज मध्ये आलेले आणखी दोघे जण कोण होते? त्यांचा या घटनेशी काय संबंध होता? आता मनसे सैनिक किंवा तहसील प्रशासन यावर काय भूमिका घेणार ?  हा तांदूळ रेशनचा असेल तर या दिवसाढवळ्या होणाऱ्या काळ्याबाजाराला डोळ्यावर पट्टी बांधून अभय दिले जाणार का ?  असे अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेला पडले असून कर्तव्यदक्ष तहसिलदार   या घटनेची उकल कशा पध्दतीने करुन  सत्य उजेडात आणतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.