Breaking News

औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

औरंगाबाद/ प्रतिनिधी

येथील एमजीएम रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण केली. हा प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

एमजीएम रुग्णालयात दाखल केलेल्या एका रुग्णावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा समज झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. यावेळी त्यांनी अतिदक्षता कक्षाच्या काचाही फोडल्या. विशेष म्हणजे, त्यावेळी अतिदक्षता कक्षात इतर 22 रुग्णांवर उपचार सुरू होते. या घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालयाची तोडफोड करणार्‍या आणि डॉक्टरांना मारहाण करणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.