Breaking News

सीबीआयमार्फत होणार सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य !

सुशांत राजपूत की फिल्म देखकर 7वीं की ...

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपास करण्याची बिहार सरकारची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत होणार आहे. बिहार सरकारने मंगळवारी (4 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपासाची शिफारस केंद्र सरकारला केली होती.

     सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यानंतर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी केंद्र सरकारचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा ही बिहार सरकारची शिफारस मान्य करण्यात आली आहे.

    दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत होते. त्यादरम्यानच पाटण्यात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार मुंबईत पोहोचले आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. यावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसात संघर्षही झाला होता. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केल्याने हा संघर्ष शिगेला पोहोचला. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचा जबाब नोंदवला आहे.

    सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील आपल्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली या दृष्टीने मुंबई पोलीस तपास करत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची चौकशी केली आहे. यामध्ये महेश भट यांच्यापासून संजय लीला भन्साली यांचा समावेश आहे.