Breaking News

सीरम संस्थेला शरद पवारांची अचानक भेट !

सीरम संस्थेला शरद पवारांची अचानक भेट
- कोरोनावरील लसीच्या तयारीची घेतली माहिती
पुणे /प्रतिनिधी
बहुचर्चित असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून विकसित केल्या जात असलेल्या कोरोनावरील लशीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेत आढावा घेतला. त्यावेळी सीरम इन्स्टिट्यूटला अचानक भेट देत कंपनीचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी या लसीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच मांजरी येथील लसीच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन त्याची पाहणी केली.
सध्या जगभर कोरोनाच्या संसर्गाने हैराण केले आहे. या विषाणूला प्रतिबंध करणार्‍या लसीच्या निर्मितीसाठी जगभर अनेक कंपन्या झटत आहेत. अनेक शास्त्रज्ञांचे हात यासंदर्भात कष्ट करीत आहेत. पहिल्या टप्प्यातील चाचण्या संपून दुसर्‍या टप्प्यातील अनेक कंपन्यांच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या लसीबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. या लस निर्मितीच्या स्पर्धेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेदेखील उडी घेतली असून, त्यांनी जगातील सात कंपन्याशी लशीच्या संशोधन, उत्पादन प्रक्रियेसाठी भागीदारी केली आहे. त्या भागीदाराच भाग म्हणून त्यांनी विकसित केलेली लस ही अंतिम टप्प्याकडे असली तरी त्याला अद्याप डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे खुद्द डॉ. सायरस आणि आदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यावेळी अन्य कंपन्यांप्रमाणे आम्ही बाजारात लस आणण्याची घाई करणार नाही. आम्हाला लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता महत्वाची आहे, असे आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले होते.
------------------------------