Breaking News

कोरोनाचे संकट घालवा अशी प्रार्थना करत गोराईला निरोप !

कोरोनाचे संकट घालवा अशी प्रार्थना करत गोराईला निरोप
सुपा/प्रतिनिधी :
दोन दिवसांपुर्वी आगमन झालेल्या गौराईला गुरुवारी पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात मोठ्या भाक्तीभावाने निरोप देण्यात आला. श्रावण, भाद्रपद हे महिने भाविकांसाठी एक पर्वनी असते, कारण या महिन्यात मोठ्या प्रमाण सणवाराची रेलचेल सुरू असते. संपुर्ण महाराष्ट्र गौरी गणपतीची आतुरतेने वाट पहात असतो. शनिवार दि,22 ऑगस्ट रोजी गणपती बप्पा आल्यावर महिला वर्गाला गौरीच्या आगमनाची ओढ लागली. 
    भाद्रपद शुक्ल 7 शके 1942 मंगळवार दि.25 ऑगस्ट रोजी शुभ मुहर्तावर गौराईचे घराघरात लक्ष्मीच्या नेत्रदिपक सजावट, सुवर्ण अलंकरांची रचनात्मक साज, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, रेषमी वस्त्र व स्वादिष्ट खाद्य पदार्थाची रेलचेल अशा आनंदी व प्रसन्न वातावरणात मंगळवारी गौराईचे आगमन झाले. बुधवारी पंचपक्वानाने जेऊ घालण्याची परंपरा पार पडली व गुरुवारी दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तिसर्‍या दिवशी पारंपारिक पद्धतीने गौराईला निरोप देण्यात आला.
     पुर्वीच्याकाळी गौरीची पुजा ही फक्त शहरांनी कोकण व काही ठराविक घरांनीच गौराईची स्थापना होत असे. आता काळानुसार ग्रामीण भागातही गौराईचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. गौराईला लक्ष्मीचे सौभाग्य समृद्धी सुखाचे प्रतिक मानले जात असल्याने या सणाला मोठा लवाजमा आप्तेष्ट नातेवाईक जमा होतात. चालु वर्षे कोरोना संसर्गाने गौरी गणपतीच्या उत्सावाला बंधने आले असले तरी भक्ती श्रद्धा कुठेच कमी पडली नाही, अशा या गौराईचे मंगळवारी आगमन झाले होते. दुसर्‍या दिवशी त्यांना गोडधोड जेवनाचा नैवेद्य केला जातो तर तिसर्‍या दिवशी विधिवत विसर्जन करण्यात आले.