Breaking News

श्रीगोंदा तालुका भाजपाचे महादूध एल्गार आंदोलन !

श्रीगोंदा तालुका भाजपाचे महादूध एल्गार आंदोलन 
------------
दूधप्रश्नी तालुक्यातून मुख्यमंत्र्याना पाच हजार पोस्टकार्ड  पाठविणार : आमदार बबनराव पाचपुते 
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वा-यावर सोडले आहे, जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही, राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत सापडले आहेत, मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादकांचे दुःख समजावे यासाठी दूधप्रश्नी विविध मागण्याचे पाच हजार पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना तालुक्यातून पाठविणार असल्याचे आंदोलन कर्ते आमदार बबनराव पाचपुते यांनी काष्टी  येथे आंदोलनाची सुरुवात करताना सांगितले. 

भाजपा महायुतीच्या वतीने २१ जुलै रोजी राज्यभर शासनाला दूध भेट देऊन १ ऑगस्ट  रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा भाजपाकडून निर्णय घेण्यात आलेला होता. दि १ ऑगस्ट रोजी अन्यायाविरुद्ध एल्गार करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती   आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्याने याच दिवशी दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपा श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने श्रीगोंदा येथील शनिचौका मध्ये   अहिंसक पध्द्तीने दूध वाटप करून  'महा एल्गार आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाच्या निमित्ताने गायीच्या दुधाला सरसकट प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो ५० रुपये अनुदान मिळावे, दूध खरेदीचा दर प्रति लिटर ३० रुपये करावा अशा मागण्या त्यावेळी करण्यात आलेल्या होत्या मात्र राज्य सरकार ने राज्यभर झालेल्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल न घेता दूध उत्पादक शेतक-याना वा-यावर सोडून दिले. मागील केलेल्या आंदोलनामुळे सरकार दखल घेऊन निर्णय घेईल, काहीतरी घोषणा करेल अशी अपेक्षा होती, मात्र सरकारच्या वेळकाढू पणामुळे दूध उत्पादकांची सरकार क्रूर चेष्टा करत आहे. महिना उलटूनही सरकार दूध उत्पादकांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी श्रीगोंदा तालुका भाजपाच्या वतीने विविध मागण्याचे पाच हजार पोस्टकार्ड पाठवून आजपासून महादूध एल्गार आंदोलन सुरु करत असल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले . व आ.पाचपुते यांनी स्वतः दूध उत्पादक शेतक-यांच्या गोट्यावर जाऊन काही पोस्टकार्ड स्वीकारली. दूध उत्पादक शेतक-यांनी दूध दरवाढी बाबत चे पोस्टकार्ड स्वतः च्या नाव व सहीनिशी मुख्यमंत्र्यांना पाठवावेत असे आवाहन आ.पाचपुते यांनी यावेळी केले. 
या आंदोलनात आमदार बबनराव पाचपुते, जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते, जि.प. सदस्य सदाशिवराव पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपसरपंच सुनील तात्या पाचपुते, अमोल पवार, भास्कर तात्या जगताप, शहाजी भोसले, लालासाहेब फाळके, चांगदेव मेजर पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, राहुल टिमूने, बन्सी महाराज पाचपुते, रवींद्र दांगट  इ कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. 

सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली -आ पाचपुते 
सध्याचे सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारे न्याय दिला नाही दुधाच्या भावासंधर्भात सरकार गंभीर नाही त्यामुळे आता थेट गोठ्यातून मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून न्याय मागणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली