Breaking News

मोदीं हवे रामराज्य..पण कसे?

 मोदीं हवे रामराज्य..पण कसे?

                 

ज्या विचारांचे सरकार असते,त्या पक्षांच्या ध्येय धोरणाचे स्वप्न साकार होणे स्वाभाविक आहे.याच मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून अयोध्येत राम मंदीर साकार होणे स्वाभाविकच म्हटले पाहीजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्यदिव्य सोहळ्यातून या स्वप्नपुर्तीची झलकंही देशानं पाहीली.यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द न भुतो न भविष्यती ठरलेत.आम्ही भविष्यवेत्ते नसलो तरी यासारखे भाषण मोदींना पुन्हा शक्य नाही.अयोध्येत दिसलेले  वेगळेच मोदी देशाने अनुभवलेत.माञ कथनीतले मोदी करणीतही दिसतील का? रामराज्याची परिकल्पना प्रत्यक्षात साकारली जाईल का? गांधीवादाला अपेक्षित असलेला राम आणि आंबेडकर वादाला भावलेला राम यातील अंतर मोदी कसे तोडणार?  ..

देशाला राज्य घटना देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींच्या मनातील राम आणि रामराज्याने यत्किंचीतही प्रभावीत नव्हते.राम किंवा रामराज्यावर डॉ.आंबेडकर नेहमीच टिकेच्या भुमिकेत दिसले.ही बाब नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर प्रभाव टाकून गेली असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे स्वप्न साकार करणारा सोहळा देशाने अनुभवला .या सोहळ्यात एका वेगळ्याच मोदींचा शोध देशाला लागला.त्यांचा प्रत्येक शब्द रामराज्याच्या आदर्शाने भारावलेला दिसला.गावोगावच्या रामकथांचा सार एखाद दुसऱ्या शब्दात वर्णन करून सांगतांना मोदींच्या चेहऱ्यावर  दिसणारे भाव देशात रामराज्य अवतरल्याचेच दाखवित होते.वेगवेगळ्या राज्यातील देशातील रामसार सांगतांना या भुमीत नेमकं कुठल्या प्रकारचे रामराज्य अवतारणार याविषयी भारतीय संभ्रमात पडलेत.
रामराज्याविषयी प्रत्येकाची परिकल्पना वेगळी आहे,
महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरूषांमध्येही रामराज्याबाबत प्रचंड मतभेद होते.भारतीय स्वातंञ्य चळवळीतील सर्वोच्चस्थानावरचे नेते म्हणून मान्यता असलेले महात्मा गांधी यांना या देशात रामराज्य आणायचे होते.माञ रामराज्य म्हणजे नक्की काय याची व्याख्या महात्मा गांधींना शेवटपर्यंत समाजाला देता आली नाही.ही संदिग्धता जाणीवपुर्वक ठेवली असाही आक्षेप नोंदवला जातो आहे.सत्तेचे विकेंद्रीकरण,स्वशासन,सर्व शिक्षा अभियान ग्राम स्वराज्य अशा अलग अलग घटकांचा गांधींनी खुला प्रतिपाळ केला तर कधी कधी त्यांच्या    रामराज्यात गरीब श्रीमंत एकाच अधिकारात श्रेणीत त्यांनी बसवले.सामान्य माणसाला विनासायास विनाखर्च न्याय देण्याची परिकल्पना गांधींजींच्या रामराज्यात होती.म.गांधींच्या हयातीत हिंदू मुस्लीम दरी वाढत गेल्यानंतर राम रहीम एकञ समाधानाने नांदू शकतील असे राज्य म्हणजे रामराज्य अशी कल्पना मांडली.
कमजोर दुबळ्या घटकांची सेवा करणे महत्वाचे  आहे.त्याशिवाय इश्वराजवळ जाण्यास आपण लायक ठरत नाही.आपण इश्वराच्या दुबळ्या लेकरांचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरलो तर आपले संरक्षण इश्वराने करावं अशी अपेक्षा करण्याचा आपल्याला कुठलाच अधिकार पोहचत नाही.रामाने सीतेवर जसे प्रेम केले ती प्रेमाची परिभाषा आपण स्वीकारली तरच खरे रामराज्य अवतरेल ही म.गांधींची रामराज्याची कल्पना होती.
आज अयोध्येत राम मंदीर उभारणीचा जश्न सुरू असताना म.गांधी हयात असते तर त्यांची नक्की प्रतिक्रीया काय असती यावर भाष्य करण्याचा अधिकार आम्हाला पोहचत नसला तरी,भारताच्या राजकारणात रामाचा प्रवेश होण्यास महात्मा गांधींची कुटनितीच कारणीभूत आहे यावर भारातीय राजकारणाच्या इतिहासात पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.राम कारणास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले जात असले किंवा राम नामाचे श्रेय संघाकडून लाटले जात असले तरी संघाने रामनामाचा जप १९८६ नंतर सुरू केला.गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ही निती जुनीच आहे.माञ दोहोंच्या हेतूत मुलभूत फरक आहे.भारतीय मानसिकतेवर रामनामाचा असलेला प्रभाव स्वातंञ्य चळवळीला बळकट करू शकेल हा तत्कालीन गांधी काँग्रेसचा होरा होता.तसा तो प्रयोग यशस्वीही झाला.आज महात्मा गांधी असते तर कदाचित रानडे टिळक या जहाल मवाळ हिंदूत्व वाद्यांसारखा वैचारीक मिलाफ घडवून आणण्याचा त्यांनी नक्कीच खटाटोप केला असता.
याऊलट डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेत म.गांधी यांच्या मनातील रामराज्य म्हणजे जादूचा पेटारा आहे.आंबेडकरांच्या नजरेत रामराज्य वर्णव्यवस्थेवर आधारीत आहे.यासाठी डॉ.आंबेडकरांनी काही प्रमाणही दिलेत.राम शंबुकच्या उदाहरणातून त्यांनी हे पटवून दिलंय.शंबुक शुद्र होता.तारीही तपस्येत लीन होता.राम राज्यात प्रत्येकाचे कर्म निश्चित होते.तपस्या करणे शुद्राचे काम नव्हते.शंबुक शुद्राने तपस्या केल्यानेच ब्राम्हण मुलाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून शंबुकचा वध करण्यात आला.वर्ण व्यवस्थेच हे उदाहरण आंबेडकर नेहमी देत होते.
प्रश्न असा निर्माण होतो की,अयोध्येत राम मंदीर उभे रहात असताना देशाला रामराज्य अवतरण्याची प्रतिक्षा आहे.नरेंद्र मोदी यांच्या भाषणात शब्दाशब्दांतून रामराज्य प्रसवत होतं.माञ प्रत्यक्षात कारभार रामराज्याला साजेसा होईल का? झाला तर महात्मा गांधींना अपेक्षित असलेले रामराज्य येईल की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी टिका करावी लागली तसे रामराज्य येणार हाच खरा प्रश्न आहे.