Breaking News

दाऊद पाकिस्तानमध्येच!

Pakistan admits Dawood Ibrahim lives in Karachi, imposes financial ...

आंतरराष्ट्रीय समुदयाच्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स(एफएटीएफ)च्या  काळ्या यादीपासून स्वत:ला वाचविण्यासाठी पाकिस्तानची केवीलवाणी धडपड सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. हा देश सद्या भिकेला लागला असून, त्याला जगाने मदत करावी, अशी भीक पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभर मागत असतात. ज्या दाऊदला इतकी वर्षे हा देश पोसतो आहे आणि भारताविरोधात खूनखराबा करण्यासाठी वापरतो आहे, त्याचा बुरखा काल-परवा फाटला. त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्यांत गुन्हेगार असलेला हा कुख्यात गुंड पाकिस्तानात नाही, असे सर्रास खोटे हा देश बोलत होता. तर भारताने वारंवार पुरावे, पत्ता देऊनही त्याच्यावर कारवाई न करता दाऊदला लष्करी सुरक्षा पाकिस्तानने पुरवली होती. आता ही भामटी मंडळी तोंडावर पडली ते बरेच झाले. अलिकडेच या देशाने हाफिझ सईद, मौलाना मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिमसह 88 दहशतवादी गटांवर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. या सर्वांची संपत्ती जप्त करण्याचे आणि बँक खाती गोठविण्याचा आदेशही पाकिस्तान सरकारने जारी केला आहे. या निर्बंधांमुळे दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याची अप्रत्यक्ष कबुली या देशाने दिली. एफएटीएफने जून 2018 मध्ये पाकिस्तानला दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे व निधी उपलब्ध करण्याच्या आरोपात ‘ग्रे’ यादीत टाकले होते. यातून बाहेर पडण्यासाठी या जागतिक संघटनेने पाकिस्तानपुढे अनेक जाचक अटी ठेवल्या होत्या. त्यांची पूर्तता न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, या वर्षीच्या सुरुवातीला कोरोना महामारीला सुरुवात झाल्याने, अटींच्या पूर्ततेसाठी पाकिस्तानला मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदतही संपत आल्याने, पाकिस्तान सरकारने 18 ऑगस्टरोजी दोन अधिसूचना जारी करीत, मुंबईवरील 26/11 रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिझ सईद, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि पळपुटा दाऊद इब्राहिम तसेच पाकिस्तानच्या भूमीत सक्रिय असलेल्या 88 अतिरेकी गटांवर नव्याने निर्बंध लादले. ज्या संघटनांवर पाकिस्तान सरकारने कारवाई केली आहे, त्यात जमात-उद-दावा आणि जैश-ए-मोहम्मदसह तालिबान, हक्कानी नेटवर्क, अल्-कायदाचा समावेश असून, अतिरेकी नेत्यांमध्ये सईद, अझहर, मुल्ला फझलुल्ला, झकिउर रेहमान लखवी, मोहम्मद याहया मुजाहिद, अब्दुल हकीम मुराद, नूर वली मेहसूद, फझल रेहमान शाह (उझबेकिस्तान लिबरेशन मुव्हमेंटचा म्होरक्या), तालिबानी नेता जलालुद्दिन हक्कानी, खलिल अहमद हक्कानी, याहया हक्कानी, दाऊद इब्राहिमचा समावेश आहे. खरे तर दहशतवादी, माफिया आणि अराजकता पसरवणार्‍या लोकांना आश्रय देणे हीच पाकिस्तानची खरी ओळख बनली आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचे नंदनवन बनले असून, तेथील लोकप्रतिनिधींकडे काही अधिकार नाहीत, दाऊदला पाकिस्तानच्या लष्कराचे समर्थन आहे, त्यामुळे दाऊदवर प्रहार म्हणजे पाकिस्तानी लष्करावर आणि पाकिस्तानवर प्रहार अशी तेथील समजूत आहे. दाऊदची मालमत्ता गोठविण्याची कारवाई म्हणजे, खरे बोलल्यामुळे जगात आपली विश्‍वासार्हता वाढेल, असे पाकिस्तानला वाटत असावे. पण पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या दबावात पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला आपले वक्तव्य फिरवावे लागले आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याचे कालच पाकिस्तानने कबूल केले होते. पण भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेला दाऊद आपल्याकडे शरण असल्याचे मान्य केले तर याचे विपरित परिणाम होतील, या भीतीने पाकिस्तानने दाऊदला दहशतवादी मानायला नकार दिला. खरे तर तो दहशतवादी आहेच आणि त्याला संयुक्त राष्ट्रांनी तसे घोषित केले आहे. पाकिस्तानने दहशतवादी कारवायांशी जोडल्या गेलेल्या 88 नेते आणि दहशतवादी गटांशी जोडल्या गेलेल्या सदस्यांवर कारवाईचे आश्‍वासन दिले. या 88 जणांची यादी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जाहीर केली होती. या यादीमध्ये दाऊद इब्राहिमचा अगदी ठळक समावेश आहे. भारत जेव्हा अगदी छातीठोकपणे दाऊद हा पाकिस्तानातील कराचीत राहतो, असे सांगत होता. तेव्हा पाकिस्तान भारताचा हा दावा फेटाळून लावत होता. आता त्यांनीच कबुली दिली आहे. दाऊद पाकिस्तानात राहात असेल तर त्याला तातडीने अटक करून भारताच्या ताब्यात द्यायला हवे. तसे होत नसेल तर पाकिस्तानावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवून त्यांची आर्थिक मदत थांबवायला हवी. म्हणजे, आधीच भिकेला लागलेला हा देश वठणीवर तरी येईल!