Breaking News

कोल्हेंकडून उजनी योजना बंद पांडण्याचे पाप – बाबुराव थोरात

कोल्हेंकडून उजनी योजना बंद पांडण्याचे पाप – बाबुराव थोरात

कोपरगाव प्रतिनिधी  –
 ३५ वर्ष सत्ता भोगलेल्या माजी आमदारांनी (नॉट फिजिबल) न परवडणारी म्हणून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना बासनात गुंडाळून ठेवली. तीच योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पुन्हा सुरु करून या भागातील शेतीला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. मात्र त्यानंतर २०१४ ते २०१९ पर्यंत ज्यांनी या योजनेकडे ढुंकून देखील पाहिले नाही त्यांनीच आपला आदर्श पुढे चालवीत आमदार आशुतोष काळे यांनी महाप्रयासाने सुरु केलेली उजनी योजना बंद पाडण्याचे पाप केले असल्याची टीका उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मागील आठवड्यात २०१४ पासून बंद पडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना दिलेले शब्दाची वचनपूर्ती केली होती. हि योजना सहा महिन्यापूर्वीच आमदार आशुतोष काळे यांनी सुरु करण्याचे ठरविले होते. मात्र मागील पाच वर्षात दुर्लक्षित असलेल्या या योजनेची अनेक ठिकाणी पाईप गळती व पंप हाऊसचे दुरुस्तीचे कामामुळे व कोरोनाच्या महामारीमुळे हि योजना कार्यान्वित होण्यात थोडा उशीर झाला. तरीही ओव्हरफ्लोच्या पाण्यातून या योजनेच्या पाझर तलावात पाणी साचण्यास सुरुवात होवून परिसरातील शेतकरी आनंदित झाला होता. मात्र शेतकऱ्यांना झालेला हा आनंद माजी आमदार कोल्हेंना पाहवला नाही. आपले मागील पाच वर्षात या योजनेसाठी योगदान नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अगोदरच कमी झालेली मतदानाची टक्केवारी भविष्यात आणखी घसरणार या भीतीपोटी त्यांनी आपले समर्थक व कर्मचारी पाठवून या योजनेचे वीजपंप बंद करून ज्याप्रमाणे शेतकरी संप मोडून शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालविले त्याप्रमाणेच आज पुन्हा एकदा उजनी योजना बंद करून त्यांच्या मनात शेतकऱ्यांविषयी किती द्वेष आहे हे दिसून आले असल्याचे बाबुराव थोरात यांनी म्हटले आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी केलेले प्रयत्न या भागातील शेतकरी जाणून आहेत. मात्र ज्यांना या योजनेसाठी मागील पाच वर्षात पाण्याचा थेंब आणता आला नाही त्यांनीच हि योजना बंद पाडावी हे या भागातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आज जरी तुम्ही उजनी चारी योजना बंद करून आम्हा शेतकऱ्यांच्या अन्नात पुन्हा माती कालविण्याच्या केलेल्या प्रयत्नांची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. तुम्ही कितीही हि योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करा मात्र कोणत्याही परिस्थितीत हि योजना सुरूच राहणार असल्याचे बाबुराव थोरात यांनी म्हटले आहे.