Breaking News

बहिरवाडीतील बेकायदा वाळू उत्खनन प्रकरणाची चौकशीची सुनावणी जिल्हाधिकारी दालनात घेण्याची मागणी !

बहिरवाडीतील बेकायदा वाळू उत्खनन प्रकरणाची चौकशीची सुनावणी जिल्हाधिकारी दालनात घेण्याची मागणी ! 

नेवासा तालुका प्रतिनिधी :
तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मुळ पंचनामा गायब केला या प्रकरणाची तक्रार  तपासून  उचित कार्यवाही  करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून या प्रकरणीची सुनावणी जिल्हाधिकारी यांचे दालनात घेण्यात यावी अशी मागणी काकासाहेब गायके यांनी केली आहे.
      माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी दि.12 मार्च 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांचेकडे नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मुळ पंचनामा गायब करून नेवासा तहसील कार्यालयाने  बनावट पंचनामा केला असल्याची  तक्रार  केली होती.या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हे आदेश दिले आहेत.नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मध्ये 1200 ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन झाल्याचा पंचनामा एक मंडळअधिकारी व चार तलाठी यांचे संयुक्त पथकाने केला होता.मात्र नंतर हा मूळ पंचनामा गायब करून केवळ 118 ब्रासचा बनावट पंचनामा तयार करून मुळ पंचनाम्याच्या सत्यप्रती नष्ट केल्या. महसूल विभागाचे नुकसान करणाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी काकासाहेब गायके यांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचे कडे केली होती. 
महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले असतांना ही चौकशी नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी(प्रांत) यांनी करावी असे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी काढले आहेत. प्रांतांकडुन होणारी ही चौकशी आपणास मान्य नसून या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी यांचे दालनात त्यांचे समोर घेण्यात यावी अन्यथा महसूल मंत्री व न्यायालयाकडे दाद मागावी लागेल असे श्री.गायके यांनी म्हंटले आहे. तसे निवेदन त्यांनी बुधवार दि.19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.