Breaking News

‘सिल्व्हर ओक’वरील सहा जणांना कोरोना

शरद पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

- पवारांच्या ताफ्यातील तीन सुरक्षारक्षक, सिल्व्हर ओकमधील दोन कर्मचारी कोरोनाग्रस्त

मुंबई/ प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाही राज्याच्या विविध भागांना भेटी देत आहेत. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला असून, तेथील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. दरम्यान, शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर येथे बोलताना दिली आहे. तसेच शरद पवार यांना राज्यात फिरु नका, अशी विनंतीही करणार असल्याचे ना. टोपे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षारक्षक तसेच निवासस्थानावरील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नसल्याने चिंता मिटली आहे. पवार यांच्या निवासस्थानी 15 सुरक्षारक्षक तैनात असतात. एकूण सहा जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तीन सुरक्षारक्षक आणि दोन कर्मचारी अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, सिल्व्हर ओकमधील दोनजण आणि सुरक्षेसाठी तैनात असणार्‍यांपैकी तीनजण पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बर्‍याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचे काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यांना काहीही समस्या नाही. ते अत्यंत सुरक्षित आहेत. आपण त्यांना राज्यात फिरु नका, अशी विनंती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. त्याचबरोबर सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांच्या घरातील तसेच ते ज्या चाळीत राहतात तेथील लोकांची चाचणी केली जाणार आहे. त्यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सर्व गोष्टी केल्या जात आहेत, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.