Breaking News

भूमिपूजनास मोदींसह सरसंघचालकांची उपस्थिती

- अयोध्येत पूजा-अर्चा सुरु
- भूमिपूजन सोहळ्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा 
- 5 ऑगस्टचा मुहूर्त अशुभ, भूमिपूजन लांबणीवर टाका : दिग्विजय सिंह  
अयोध्या/ खास प्रतिनिधी


संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बहुप्रतीक्षित राममंदिर भूमिपूजन सोहळ्यास सोमवारपासून प्रारंभ झाला असून, मुख्य सोहळा बुधवारी (दि.5) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मंदिराचा पायाभरणी समारंभ होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. मोदी व भागवत हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान, 5 ऑगस्ट हा अशुभ मुहूर्त असून, हा सोहळा लांबणीवर टाका, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केवळ फटाके न फोडता राज्यात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांच्या नेते व कार्यकर्त्यांना केले आहे. 
अयोध्येतील राममंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी (दि.5) असला तरी या सोहळ्यास सोमवारपासूनच सुरुवात झाली. या सोहळ्याचे पौराहित्य वाराणशी व प्रयागराज येथील पंडित करत आहेत. 21 ब्राम्हणांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा विधी व इतर धार्मिक कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारच्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी भूमिपूजन स्थळाची पाहणी करून कार्यक्रम व रुपरेषेचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी अयोध्येची हवाई पाहणीदेखील केली. हनुमानगढी, रामजन्मभूमी या स्थळांची पाहणी केल्यानंतर त्यांनी उपस्थित संतांशीदेखील चर्चा केली. रामलल्लाच्या मूर्तीला 5 ऑगस्टरोजी पंडित कल्किराम यांनी तयार केलेला पोशाख घातला जाणार असून, या पोशाखांचा सेटही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुपूर्त केला.

मोदी-सरसंघचालक पहिल्यांदाच एकत्र : 
राममंदिर भूमिपूजन व पायाभरणी समारंभाची पत्रिका रामजन्मभूमी ट्रस्टच्यावतीने छापण्यात आली असून, त्याचे पहिले निमंत्रण बाबरी मशीदसाठी न्यायालयात संघर्ष करणारे इकबाल अन्सारी यांना देण्यात आली आहे. तर पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार असून, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. या दोघांसह उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. देशभरातील संत, महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे.