Breaking News

अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षा !

अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षा !
- ५ ऑगस्टला जारी राहणार जमावबंदीचे आदेश
- भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नटली
अयोध्या/ विशेष प्रतिनिधी
अयोध्येत ५ ऑगस्टरोजी आयोजित राममंदिर भूमिपूजन सोहळ्यात कुठलेही विघ्न यायला नको, यासाठी संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली असून, जमावबंदीचा आदेशही लागू राहणार आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकार्‍याने दिली.
भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच शहराच्या सीमा सील केल्या जातील. पाचपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही महत्त्वपूर्ण व्यक्तीही सहभागी होणार असल्याने, सुरक्षेत कुठलीही त्रुटी राहणार नाही, याची परिपूर्ण काळजी घेतली जाईल, असे अयोध्येतील सुरक्षाविषयक यंत्रणेची जबाबदारी असलेले पोलिस महानिरीक्षक दीपककुमार यांनी सांगितले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जास्त प्रमाणात गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. शहरात आणि राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये मोठ्या एलईडी स्क्रिन लावल्या जातील. त्यावर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार असले, तरी तिथेही गर्दी होणार नाही, यासाठी जमावबंदीचा आदेश जारी केला जाईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी अयोध्येचा दौरा करत तयारीची पाहणी केली. दरम्यान, ५ ऑगस्टरोजी अयोध्येत भूमिपूजन सोहळा सुरू झाल्यानंतर अमेरिकेतही ठिकठिकाणी आभासी पद्धतीने प्रार्थना केली जाणार आहे. हिंदू मंदिर कार्यकारी परिषद आणि हिंदू मंदिर पुजारी परिषदेने एक संयुक्त निवेदन जाहीर करून, याबाबतची माहिती दिली. अमेरिकेसोबतच कॅनडा आणि कॅरिबियन बेटांवरही अशाच प्रकारचा जल्लोष केला जाणार असल्याचे यात म्हटले आहे.