Breaking News

वडनेर बु. आरोग्य उपकेंद्रास रेफ्रीजरेटर सुपूर्द - ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचा उपक्रम !

वडनेर बु. आरोग्य उपकेंद्रास रेफ्रीजरेटर सुपूर्द - ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचा उपक्रम
पारनेर :
     "शिक्षण, आरोग्य आणि पाणी या पायाभूत सुविधा प्रगतीचा गाभा आहेत आणि त्यासाठी जे आवश्यक आहे ते पुरवण्याचा फाऊंडेशचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. भविष्यातही गरज पडेल तेव्हा आम्ही गावाच्या सोबत उभे राहू" असे प्रतिपादन ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विकास बबन वाजे यांनी केले. स्वातंत्र्यदिनी ग्रामसमृद्धी फाऊंडेशनकडून आरोग्य उपकेंद्रास फ्रीज सुपूर्द करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 
     "जागतिक महामारी कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. परंतु शासकिय निधीअभावी अजूनही अनेक सोयी सुविधांची कमतरता भासत आहे. त्यातच अँटिजेंन टेस्ट किट्स विशिष्ट तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने आणि वडनेरच्या उपकेंद्रात फ्रिज उपलब्ध नसल्याने निघोज केंद्रावर विसंबून राहावे लागत होते. टेस्ट किट्स उपलब्ध होण्यास विलंब होत होता. म्हणून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी फाऊंडेशनकडे फ्रिजची मागणी केली होती. हा फ्रीज भविष्यात विविध औषधे आणि लसी ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून आम्हाला मागणीची पूर्तता करता आली याचे विशेष समाधान वाटते" असेही ते म्हणाले.
     लॉकडाऊनच्या काळात विलगिकरण कक्ष आणि चेक पोस्टवर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पाणी, चहा व नाश्त्याची सोय फाऊंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती. 
याआधीही ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्या माध्यमातून डिजिटल वर्गखोली बनवणे, प्रयोगशाळा अद्यावत करणे, आरोग्य व रक्तदान शिबीर, गावातील सर्व शाळांना फिल्टर बसवणे, शाळांची रंगरंगोटी करणे, कुस्तीचे मैदान बनवून त्यात स्पर्धा घेणे, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनासाठी व्याख्याने आयोजित करणे असे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. एक सुशिक्षित, सुदृढ आणि सक्षम पिढी बनवण्याचे स्वप्न बाळगल्याचे सर्व सभासद आवर्जून सांगतात. 
यावेळी सरपंच सौ.रेखा येवले, उपसरपंच श्री. गणेश सुकाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा अडसूळ, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण नरसाळे, ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचे खजिनदार सोपान येवले, दत्तात्रय वाजे, राम वायदंडे, सुनिल नऱ्हे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.