Breaking News

धिक्कार असल्या पत्रकारितेचा!

अगदी कानठळ्या बसाव्यात इतका मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लढाऊ राफेल विमाने भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली तीही ३६ पैकी फक्त पाच! गेल्या काही दिवसांतील गदारोळ पाहाता भारताने फार मोठे रान मारले, अशा आवईथाटात या विमानांबद्दल काथ्याकूट चालू आहे. काही प्रसारमाध्यमे तर अशा काही अर्विभावात वार्तांकन करत आहेत, की पाच विमाने आली आणि भारत आता पार महासत्ताच होऊन बसला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तळी उचलण्याचीही काही परिसीमा असावी, पण ही परिसीमाच या प्रसारमाध्यमांची ओलांडून तळवे चाटण्याचे काम चालवले आहे. वास्तवदर्शी पत्रकारिता न करता अशी तळवेचाटू पत्रकारिता करणार्‍या प्रसारमाध्यमांपेक्षा वेश्या बर्‍या! वास्तविक पाहाता, राफेल हे भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील सातव्या प्रकारचे लढाऊ विमान आहे. अन्य सहा प्रकारची लढाऊ विमाने हवाईदल एकाचवेळी चालवत आहे. त्यात आता फक्त पाच राफेलची भर पडली. वास्तविक पाहाता, भारतीय हवाईदल हवाई युद्धासाठी नेहमीच सज्ज असते. राफेलच्या येण्याने त्या सज्जतेत भर पडली असली तरी, लॉजिस्टिक व देखभालीच्या खर्चात प्रचंड वाढदेखील झाली आहे. त्यामुळे आधीच हवाईदलाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना, त्यात राफेलच्या वाढीव खर्चाची भर पडणार आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वातून खरे तर राफेल विमाने भारतीय सैन्यदलात दाखल होऊ शकली. डॉ. सिंग यांनी एकूण ३६ विमाने मागवली होती व त्यासाठी ते आर्थिक वाटाघाटीही करत होते. परंतु, डॉ. सिंग यांचे सरकार गेल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक वाटाघाटीत घाटा सहन करून आणि नेमके किती रुपयांना एक विमान घेतले तेही न सांगता, राफेल विमानांची सौदेबाजी पूर्ण केली. आता या ३६ दासौल्त राफेल लढाऊ विमानांपैकी पहिली पाच विमाने बुधवारी हवाईदलाच्या अंबाला येथील स्टेशनवर दाखल झालीत. प्रसारमाध्यमांचे उन्मादी वार्तांकन आणि अधिकृतरित्या झालेला प्रचंड गाजावाजा यांच्या पार्श्वभूमीसह डेरेदाखल झालेही ही विमाने अत्यंत प्रगत आहेत यात वादच नाही. पण, म्हणून भारतीय हवाईदलात पहिल्यांदाच अशी विमाने आलीत, असेही काहीही नाही. हवाई दलाच्या ताफ्यात रशियन सुखोई स्यु-३० एमकेआय, प्रगत मिग-२९एम्स आणि प्रâेंच मिराज २००० एच यांचा समावेश आहे. ही सगळी चांगली आहेत आणि फार फार तर विमाने थर्ड किंवा फोर्थ जनरेशन प्रकारची आहेत. आता हवाई दलाच्या ताफ्यात राफेल फायटर विमानांचा समावेश झाला असल्याने भारताची शत्रुवर आघात करण्याची क्षमता कैकपटीने वाढली हे मान्यच करू या. परंतु, चीनच्या जे-२० या फायटर जेटसमोर राफेल टिकेल का? हादेखील मोठा प्रश्नच आहे. राफेल भारताकडे असलेल्या सुखोई-३० पेक्षा सरस आहे. पण चीनच्या जे-२० पेक्षा एक जनरेशन मागे आहे. वास्तविक पाहाता, ज्या चीनशी लढण्यासाठी म्हणून आपण हे विमान घेत आहोत, ते राफेल फक्त एक चतुर्थांश जनरेशन अ‍ॅडव्हान्स आहे. गुणात्मकदृष्ट्या त्यात फार मोठे बदल नाहीत. राफेल हे तिसर्‍या पिढीचे फायटर विमान असून, चौथ्या पिढीच्या जे-२० समोर त्याचा निभाव लागणे शक्य नाही, हे कुणीही तज्ज्ञ व्यक्ती सांगू शकेल. तरीही राफेल हे ४.५ जनरेशनचे फायटर विमान असून, भारतीय हवाईदलासाठी गेमचेंजर ठरणार आहे, असे जे भारतीय प्रसारमाध्यमे सांगत आहेत, तो निव्वळ तळवेचाटू पत्रकारितेचा परिणाम आहे. दुसरीकडे, हवाईदलाजवळीच अन्य विमानांमध्ये सोव्हिएट कालखंडातील मिकोयान मिग-२९ ही आता मोडीत काढण्याचा काळ जवळ आलेली विमानेदेखील आहेत. जमिनीवरील हल्ल्यासाठी अँग्लो-प्रâेंच एसईपीईसीएटी जग्वार आणि एतद्देशीय स्तरावर विकसित करण्यात आलेली तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) ही विमाने आहेत. परिणामी, या सर्व लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि तपासणीचा खर्च हवाईदलासाठी प्रचंड कठीण होऊन बसला असताना राफेलच्या निव्वळ आगमनाबद्दल इतका गाजावाजा केला गेला की पाहता सोय नाही. निवृत्त हवाईदलप्रमुख, लढाऊ विमानांचे वैमानिक यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सगळे टीव्ही वाहिन्यांवर चाललेल्या राफेलच्या आगमनाच्या उन्मादी स्वागतात सहभागी झाले होते. मात्र, एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे या सर्वांनी सोयीस्कर कानाडोळा केला. तो मुद्दा हा की आता वाढीव खर्च पेलणार कसा? कारण या सगळ्या विमानांची देखभाल करणे प्रचंड खर्चिक आहे आणि त्यांच्या कार्यात्मक उपलब्धतेवर याचा वाईट परिणाम होत आहे. महालेखापाल अर्थात कॅग आणि संरक्षणविषयक संसदीय समितीच्या गेल्या काही अहवालांमध्ये हवाईदलाच्या प्लॅटफॉर्म्सच्या निकृष्ट कार्यात्मक सज्जतेवर, विशेषत: लढाऊ विमानांच्या सज्जतेवर, टीका झालेली आहे. एअरक्राफ्ट ऑन ग्राउंडचा (एओजी) उच्चदर आणि मर्यादित फ्लाइंग अवर्स यांवरही अहवालात खरमरीत टीका झालेली आहे. खरे तर भारताच्या हवाईदलाला अनेक वर्षांपासून आपल्या रशियन लष्करी उपकरणांची, विशेषत: हवाईदलाचा उजवा हात समजल्या जाणार्‍या लढाऊ विमानांची देखभाल करण्यात खूप समस्या आहेत. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएट संघाचे विघटन झाल्यापासून ही समस्या तीव्र झाली. कारण, संरक्षणविषयक साधनांचे उत्पादन करणारे अनेक कारखाने युक्रेनसारख्या सोव्हिएट संघातून फुटून बाहेर पडलेल्या युक्रेनसारख्या देशांत आहेत आणि त्यांचे रशियाशी कट्टर शत्रुत्व आहे. यामुळे रशियाकडून खरेदी केलेल्या विमानांच्या सुट्या भागांचा तुटवडा जाणवू लागला. हे सुटे भाग खरेदी करणे कठीण तर आहेच, शिवाय मागणी नसल्याने किंवा कमी झाल्याने अनेक उत्पादन साखळ्या बंद झाल्यामुळे हे सुटे भाग प्रचंड महागही झाले आहेत. परिणामी, भारतीय हवाईदलाला खुल्या बाजारातून दर्जाबद्दल खात्री नसलेले सुटे भाग खरेदी करावे लागले आहेत आणि याची परिणती उपकरण बंद पडण्यात व ही विमाने लोकांच्या डोक्यावर पडण्यातही झाली आहेत. त्यात भारतीय पायलट जवानांचेही बळी गेले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात हवाईदलाने महसुली खर्चासाठी २९९.६२ अब्ज रुपयांची तरतूद केली होती. यापैकी ९१.१० अब्ज रुपये स्टोअर्ससाठी विभाजित करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे स्टोअर्ससाठी करण्यात आलेली ही तरतूद आर्थिक वर्ष १९-२०च्या तुलनेत ६.०८ अब्ज रुपयांनी कमी होती. सद्या हवाईदलाला ४२ लढाऊ स्क्वाड्रन्ससाठी मंजुरी असूनही, सध्या केवळ २८ स्क्वाड्रन्स चालवले जात आहेत. ही संख्या पुढील दोन-तीन वर्षांत आणखी कमी होणे अपेक्षित आहे. हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्स तसेच वाहतूक ताफ्याबाबतही अनेक समस्या आहेतच. मात्र, ती वेगळी कहाणी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित आत्मनिर्भरतेच्या धोरणानुसार व्यावसायिक संधींचा उपयोग न केल्याचा तो परिणाम आहे. एकंदरित काय तर राफेलचे जोरदार स्वागत करताना हवाईदलाच्या समस्यांचा विसर देशाचा पंतप्रधानांना पडला. या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याची नैतिक जबाबदारीही प्रसारमाध्यमांनी टाळली व मोदी सरकारची तळी उचलण्यात त्यांनी धन्यता मानली. आम्ही असल्या पत्रकारितेचा धिक्कार करत आहोत. राफेल फायटर विमानांचे निश्चितच स्वागत आहे. म्हणून, हवाईदलाच्या आर्थिक व इतर समस्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही. राफेल हे गेमचेंजर वैगरे नाही, कारण चीनकडे यापेक्षा चांगले फायटर विमान आहे. उन्मादी जल्लोष करणार्‍या प्रसारमाध्यमांनी हीदेखील बाब लक्ष घ्यावी!

(लेखक हे दैनिक लोकमंथन वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संपादक आहेत. संपर्क ८०८७८६१९८२)
--------------------------------------