Breaking News

लॉकडाऊनविरोधात डफली बजाव!

वंचित आघाडीचे 12 ऑगस्टला आंदोलन

- प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात घोषणा

- राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार

- तत्काळ बससेवा सुरु करण्याची मागणी


पुणे/ विशेष प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अद्याप काही ठिकाणी लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र लॉकडाऊन विरोधात आता वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमक झाली आहे. लॉकडाऊनचा निषेध म्हणून वंचितकडून 12 ऑगस्ट रोजी (बुधवारी) राज्यभरात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर बुधवारी दिवसभर डफडे वाजवण्याचा कार्यक्रम घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इत्यादी संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन आंबेडकर यांनी केले. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व आणि लॉकडाऊनला विरोध का आहे? हेदेखील समजावून सांगावे, असेही ते म्हणाले.

ज्यात मिशन बिगेन अगेन सुरु झाले असून, अद्यापही जिल्हाबंदी, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे. त्यामुळे, अनलॉकमध्येही बरेच काही लॉक असल्याने अनेकांचे रोजगार बुडत आहेत. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून, येत्या 12 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. डफली वाजवून महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्याचे काम वंचित बहुजन आघाडीकडून होणार आहे.