Breaking News

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?

 Australia's proposed tour of England to begin on September 4 ...

मुंबई । आयपीएल स्पर्धेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून दोन्ही संघांचे खेळाडू बाहेर राहतील असे बोलले जात होते. मात्र, गुरुवारी एक बातमी समोर आली आहे. त्यानुसार आयपीएलच्या सर्व सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू भाग घेऊ शकतात.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना क्वारंटाईन करु नये यासाठी आयपीएल व बीसीसीआय बरोबर चर्चा सुरु असल्याचे आरसीबीचे अध्यक्ष संजीव चुडीवाला यांनी एका निवेदनात म्हटले आहे. आरसीबी अध्यक्षांच्या मते,'इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील खेळाडू ब्रिटनमधील जैव-सुरक्षित बबलमध्ये मालिका खेळणार आहेत, म्हणून त्यांना अलग ठेवणे आवश्यक नाही. आता प्रश्न आहे की बीसीसीआय कोरोना विषाणूशी संबंधित नियम या दोन संघांच्या खेळाडूंसाठी बदलतील का?'

खेळाडूंची केवळ कोरोना टेस्ट होणार.

आरसीबीचे अध्यक्ष संजीव चुडीवाला यांनी सांगितले की, "ऍरोन फिंचसह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू 17 सप्टेंबरला युएईमध्ये दाखल होतील. त्या खेळाडूंची युएईमध्ये कोरोना टेस्ट केली जाईल. जर ते कोरोना टेस्टमध्ये निगेटिव्ह आढळले तर त्यांना अलग ठेवणे आवश्यक नाही. कारण ते आधीच जैव-सुरक्षित बबलमध्ये असतील."

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना युएईमध्ये अलग ठेवले तर सर्वात मोठे नुकसान आरसीबीचे होईल. कारण त्यांच्या संघात केन रिचर्डसन, जोशुआ फिलीप्स, फिंच आणि इंग्लंडचा मोईन अलीसारखे खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएलचे सर्व सामने खेळू शकले तर केवळ आरसीबीच नव्हे तर राजस्थान रॉयल्सलाही मोठा फायदा होईल. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधाक स्टीव्ह स्मिथ असून त्यांच्या संघात जोफ्रा आर्चर, जॉस बटलर, बेन स्टोक्स आणि टॉम करन हे इंग्लंडचे खेळाडू आहेत.

आयपीएलमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण 29 खेळाडू सहभागी होणार आहेत. वास्तविक पाहता, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात टी 20 मालिका 4 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यानंतर 11 सप्टेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल. शेवटचा सामना 16 सप्टेंबर रोजी खेळला जाईल आणि तेथून दोन्ही संघांचे खेळाडू युएईला रवाना होतील.

22 ऑगस्टला दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू युएईला पोहोचतील

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू एबी डिव्हिलियर्स, ख्रिस मॉरिस आणि डेल स्टेन 22 ऑगस्टला युएईमध्ये दाखल होतील, अशी माहिती आरसीबीचे अध्यक्ष चुडीवाला यांनी दिली. त्याचबरोबर, इसरु उदाना 1 सप्टेंबर रोजी युएईमध्ये येईल.