Breaking News

अमरधाम रस्त्यावर घनकचरा टाकून रस्ता अडविला, आरोग्य विभागच्या ठेकेदाराचा राहुरी कारखाना येथे प्रताप !

अमरधाम रस्त्यावर घनकचरा टाकून रस्ता अडविला, आरोग्य विभागच्या ठेकेदाराचा राहुरी कारखाना येथे प्रताप

सामाजिक संघटनाचे ठिय्या आंदोलन
देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
                  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ठेकेदाराने मृत आत्म्याच्या शेवटच्या प्रवासाच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, मृत जनावरे व मैला टाकून रस्ता बंद करून मृतदेहाची अहवेलना केली आहे. राहूरी कारखाना काही जागरुक नागरीकांसह माजी नगराध्यक्ष ज्योती त्रिभुवन यांचे पती दिपक त्रिभुवन यांच्या सह सत्ताधारी नगरसेवक आदिनाथ कराळे  व सामाजिक संघटना यांनी अमरधाम येथील घाणीच्या विळख्यात ठिय्या आंदोलन करून आरोग्य विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
             राहूरी कारखाना डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेत असलेल्या अमरधामच्या रस्त्यावर नगरपालिकेच्या आरोग्य ठेकेदाराने राहूरी कारखाना परिसरातील गोळा केलेला कचरा, मृत जनावरे व नगरपालिके मार्फत ठराविक फी घेऊन उपसण्यात आलेला मैला अमरधाम रस्त्यावरील विसाव्याच्या ठिकाणी टाकून अमरधामकडे जाणारा रस्ता पुर्णपणे बंद करून मृत आत्म्याच्या शेवटच्या प्रवासालाही आरोग्य ठेकेदाराने आडकाठी निर्माण केली असल्याचे शेजारील अंबिकानगर रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधीचा वास येत असल्याने माजी नगराध्यक्ष ज्योती त्रिभुवन  यांचे पती दीपक त्रिभुवन व सत्ताधारी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी समक्ष पाहणी करून सामाजिक संघटना व अंबिकानगर, कामगार वसाहत या भागातील दत्तात्रय साळुंके, प्रशांत काळे आदी कार्यकर्त्यांना एकत्र जमवून सदर घटनेची माहिती दिली. त्याचवेळी सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन अमरधाम रस्त्यावरील घाणीच्या साम्राज्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. 
             दरम्यान या आंदोलनाची माहिती नगराध्यक्ष सत्यजीत कदम व मुख्याधिकारी अजित निकत यांना आंदोलनकर्त्यांनी दिली.काही वेळातच मुख्याधिकारी अजित निकत घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सदरील ठिकानावरील घाणीच्या साम्राज्याची पाहणी करून आंदोलका समोर निशब्द उभे राहिले. त्यांनी तातडीने आरोग्य विभागाला जेसीबी, टेम्पो आदी साधन सामुग्री उपस्थित करून कचऱ्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन ठिकाणी लावण्याचे आदेश दिले.
                यावेळी बोलताना दीपक त्रिभुवन म्हणाले की, देवळाली प्रवरा नगरपालिका आरोग्य विभागाच्या ठेकेदाराने डिझेल वाचविण्याच्या स्वार्थापोटी राहूरी कारखाना परिसरातील गोळा केलेला कचरा, मृत जनावरे व शौचालयातील उपासण्यात आलेला मैला अमराधामाच्या रस्त्यावरील विसाव्याच्या ठिकाणी टाकून मृत आत्म्याच्या शेवटच्या प्रवासात आडकाठी आणून घाणेरडा प्रकार केला असून मृत आत्म्याची अवहेलना करणाऱ्या आरोग्य विभागाच्या संबधित ठेकेदारावर नगरपालिका मुख्याधिकारी यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी केली.
           यावेळी उपस्थित आंदोलन कर्त्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेने डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील अमरधामचा विकास करण्यासाठी कारखाना ना हरकत प्रमाणपत्र देत असल्याचे सांगते तर कारखान्याच्या मालकीच्या जागेत आरोग्य ठेकेदाराला कचरा, मृत जनावरे  टाकण्याचा अधिकार कोणी दिला आदी प्रश्ननांचा भडिमार मुख्याधिकारी निकत यांच्यावर केला.
             यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी अमरधामचा सर्व परिसर व रस्ता दिवसभरात कचरा व मृत जनावरे उचलून साफ करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
                 या आंदोलनात दत्तात्रय साळुंके, प्रशांत काळे, प्रसाद लोखंडे, अतुल त्रिभुवन, मारुती मोरे,मनोज इनामदार,सतीश वाघ,किरण मोरे,प्रकाश मोरे,दीपक भंडारे, नितीन वाघ,बबलू गाढे, संदेश पाटोळे, दत्ता साळुंके, साई सातपुते, भरत गोंधळी, आदी सहभागी झाले होते. यावेळी नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, आरोग्य विभाग प्रमुख अमोल दातीर, कृष्णा महांकाळ,  नगरसेविकांचे पती भारत शेटे, सचिन सरोदे उपस्थित होते.

नगराध्यक्ष कदम यांनी ठेकेदाराला झापले 
                   अमरधाम येथे ठिय्या आंदोलन चालू असताना नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांना आंदोलन ठिकाणी येण्याची विनंती केली असता कामात व्यस्त असल्याने मी येऊ शकत नाही असे सांगून उपस्थित असलेल्या आरोग्य ठेकेदाराला नगराध्यक्ष कदम यांनी आरोग्य ठेकेदाराला भ्रमणभाषवर संपर्क साधून ठिय्या आंदोलनबाबत खडे बोल सुनावत झापित असल्याचा ठेकेदाराच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन  स्पष्टपणे जाणवत होते.

त्या ठेकेदाराविरुद्ध दंड आकारणी करणार 
                     राहूरी कारखाना ठिय्या आंदोलनाच्या घटनास्थळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी आंदोलन कर्त्यांना येथील सर्व कचरा उचलण्याचे आश्वासन देत नगरपालिका सह आरोग्य ठेकेदाराची चूक मान्य करत आरोग्य विभाग प्रमुख यांना  नोटीस काढून, संबधित आरोग्य ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक  कारवाई करण्यात येईल असे निकत यांनी सांगितले.