Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून पवार संतापले!

मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून पवार संतापले!
- ..मग सरकार करतंय काय? ठाकरेंच्या एकेरी उल्लेखावरून पवारांचा संजय राऊतांना फोन
मुंबई / प्रतिनिधी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज निरनिराळ्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच, या प्रकरणावरून एका वृत्तवाहिनीतील पत्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. मग सरकार करतंय काय? असा सवाल त्यांनी खासदार संजय राऊत यांना विचारला. संजय राऊत यांनीच याबाबती माहिती दिली.
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात नमूद केले, की महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाडायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते ‘गॉसिपिंग!’ लोकांच्या मनातील संशय वाढवला. अर्णब गोस्वामी हे ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला, एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते. शेवटी त्यांनी प्रश्न केला, ‘मग सरकार काय करते?’ पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे, असे राऊत यांनी नमूद केले.
--------------------------------