Breaking News

नियम मोडणार्‍या खासगी हॉस्पिटल्सची खैर नाही, कोरोना रुग्णांची लूट करणार्‍या हॉस्पिटल्सना इशारा !

नियम मोडणार्‍या खासगी हॉस्पिटल्सची खैर नाही, कोरोना रुग्णांची लूट करणार्‍या हॉस्पिटल्सना इशारा !

- राज्याचे आरोग्यमंत्री आक्रमक
- राज्यासाठी ५०० रुग्णवाहिका खरेदी करणार
- खासगी हॉस्पिटल्समधील ८० टक्के बेडस् राखीव
कोल्हापूर/ जिल्हा प्रतिनिधी
देशात महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त उद्रेक आहे. त्यामुळे राज्य सरकार युद्धपातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांवर उपचार करत असतांना खासगी हॉस्पिटल्सनांही सरकारने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचे पालन न करणार्‍या हॉस्पिटल्सवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राजेश टोपे म्हणाले, खासगी रुग्णालय पेशंटना तपासात नाहीत अशा तक्रारी येत आहेत. असे करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास कडक करावाई करण्यात येईल. खासगी हॉस्पिटल्सनी अ‍ॅण्टीजेन किट ठेवल्या पाहिजेत. राज्याची गरज लक्षात घेऊन सरकार नव्या ५०० रुग्णवाहिका खरेदी करणार असून, आम्ही वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध करणार आहोत. काही खासगी रुग्णालयात अनेकवेळा रुग्णाला तपासले जात नाही. कारोनाच्या भीतीने रुग्णाची तपासणी न करणे अत्यंत चुकीचे आहे. कोरोनाची लागण न झालेल्या रुग्णाला उपचारासाठी नाकारु नये. रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले. खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव पाहिजे. कोणी जास्त बिल आकारात असेल तर अत्यंत चुकीचे आहे. अगोदर बिल ऑडिटरकडे पाठवावे, नंतर रुग्णाला द्यावे. जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करावी. भरारी पथके नियुक्त करण्याचे सर्वांना सांगितले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. कोल्हापूर, सातारा आयएमए यांनी माणुसकी दाखवून सेवा द्यावी. रुग्ण बरा होईपर्यंत सेवा द्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र जागा रिकाम्या आहेत. तिथे जिल्हाधिकार्‍यांनी वॉकिंग इंटरव्ह्यू घ्यावेत, असा सल्ला राजेश टोपे यांनी दिला. डॅशबोर्डवर बेडविषयी माहिती अपडेट करावी. त्यामुळे सामान्य माणसाला अडचण येणार नाही. आयसीयू बेडवर लक्षणे नसलेला रुग्ण उपचार घेत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे गरजू रुग्णाला बेड मिळणार नाही, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
--
कोविड पॉझिटिव्ह नको असेल, तर फाटके
कपडे घाला : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे
सोलापूर : चांगले कपडे घातले, सूट, बूट घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हच येतात, असे विधान माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भर बैठकीत केले. शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ये दोघे सोलापूर दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेस कमिटीमध्ये स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक देखील घेतली. या बैठकीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हेदेखील उपस्थित होते. कोरोनाविषयी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बैठकीत हशा पिकला. तसेच, याप्रश्नाचे गांभीर्यदेखील महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आले.
----------------------