Breaking News

राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू!

राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू!

- सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
- शेट्टींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका
- राजकीय वातावरण तापले
इस्लामपूर (सांगली)/ प्रतिनिधी
राजू शेट्टी नव्हे तर हा काजू शेट्टी असून, तो गावात सोडलेला वळू आहे, अशी खालच्या पातळीवर जाऊन शनिवारी (दि.१) सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनावेळी सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत अशा प्रकारचे घृणास्पद टीकास्त्र डागले. या टिकेला राजू शेट्टींनी त्वरित प्रत्युत्तर देत आंदोलन फसल्याने सदा खोत पिसाळला असल्याचे म्हटले. त्यामुळे आजचा दिवस दोन शेतकरी नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाने गाजला.
रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेवेळी राजू शेट्टी हे भंपक व्यक्ती असल्याचा शब्दप्रयोग केला. त्याला राजू शेट्टी यांनी त्वरित प्रत्युत्तर देत, सदाभाऊ खोत यांचे आंदोलन माझ्याविरोधात आहे की सरकारविरोधात असा सवाल केला. खोत यांचे आंदोलन फेल गेल्याने त्यांचे ताळतंत्र बिघडले आहे. तसेच खोत यांनी आपली पातळी सोडली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. दूध दरवाढीवरुन भाजपने राज्यभरात पुकारलेले आंदोलन म्हणजे पुतनामावशीचे प्रेम आहे. भाजपला दूध दरवाढीवरुन आंदोलन करण्याचा अधिकार नाही. भाजपाच्याच काळात शेतकरी अडचणीत आला. फक्त राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे, अशीही टीका राजू शेट्टी यांनी केली.
---------------------------------