Breaking News

संगमनेरच्या भूमिपुत्राला अर्जुन पुरस्कार जाहीर

 - मंगळापूरच्या दत्तू भोकनळेने जिल्ह्याचा लौकिक देशात वाढविला

मुंबई/ प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील मंगळापूरसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळविला आहे. हा पुरस्कार संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

शनिवारी केंद्र सरकारच्यावतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  याबाबत बोलताना महसूलमंत्री थोरात म्हणाले की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार महाराष्ट्रीय क्रिकेटपटू हा रोहित शर्मा यांना मिळाला तर अर्जुन पुरस्कारांमध्ये रोइंग पटू दत्तू भोकनळ, महिला खो खो संघाची कर्णधार सारिका काळे, कुस्तीपटू राहुल आवारे या महाराष्ट्रीयन खेळाडूंनी बाजी मारली आहे. दत्तू भोकनळ हा रोइंमधून देशाचे प्रतिनिधित्व करत असून, त्याने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला मोठे यश मिळवून दिले होते. सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मंगळापूर येथील दत्तू भोकनळ याने गरिबीचे मोठे चटके सोसले. विहिरीचे खोदकाम केले. त्याची भारतीय सैन्यात निवड झाल्यावर त्याने रोईंग खेळावर लक्ष केंद्रीत करुन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ध्येय गाठले.