Breaking News

जीवे मारण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्यानेच गुन्हा दाखल,युवराज ढमाले यांचा खुलासा !

जीवे मारण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्यानेच गुन्हा दाखल,युवराज ढमाले यांचा खुलासा !
राजकीय षडयंत्र असण्याचा संबंध नाही; 'सीबीआय' चौकशी करावी
पुणे : 
गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याने मला माझ्या जीवाची, कुटुंबाची काळजी वाटू लागली होती. खूप अस्वस्थ वाटल्यानेच माझे मेव्हणे माजी खासदार संजय काकडे आणि बहीण उषा संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. काकडे दाम्पत्यांकडून माझ्या जीविताला काही धोका होऊ नये, यासाठीच हा गुन्हा दाखल केला आहे. यामागे कोणतेही राजकीय षडयंत्र नाही किंवा पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असण्याचे कारण नाही. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असा खुलासा बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी खासदार संजय काकडे व उषा संजय काकडे यांच्यावर त्यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे राजकीय षडयंत्र असल्याचे, तसेच आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवराज ढमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
युवराज ढमाले म्हणाले, "कौटुंबिक ईर्ष्येतून काकडे दाम्पत्याने २०१७ पासून वेळोवेळी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अर्वाच्च शिवीगाळ केली. खालच्या भाषेत बोलत मला अपघात घडवून, सुपारी देऊन, गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, सख्खी बहीण आणि मेव्हणा असल्याने बऱ्याचदा मी माझी नेमकी काय चूक आहे, असे विचारण्याचा प्रयत्न केला. घरातील वाद सामंजस्याने मिटण्याच्या आशेने आणि प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याने मी गेली दोन वर्षे गुन्हा दाखल करू शकलो नाही. परंतु, आता मला खूप अस्वस्थ व दबाव वाटू लागल्याने भीतीपोटी धीर एकवटून २७ मे २०२० रोजी पोलिसांना पत्र दिले. त्यानंतर २ ऑगस्टला गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी एक दिवसांत गुन्हा दाखल केल्याचे सांगून काकडे माध्यमांची दिशाभूल करत आहेत. त्याचबरोबर काकडे यांनी गेल्या १० वर्षात त्यांचा माझ्याशी कोणताही व्यावसायिक संबंध नव्हता, हे चुकीचे सांगितले आहे. २३ मे २०१९ रोजी आमच्यातील व्यवहार झाला आहे."

"गेल्या २०-२५ वर्षांपासून व्यक्तिशः त्यांना ओळखत असून, त्यांच्यासोबत अनेक वर्षे व्यवसाय केला आहे. त्यांच्यापासून वेगळे होत व्यवसायात, सामाजिक कार्यात स्वतःची प्रगती साधल्यानेच मी त्यांच्या डोळ्यात खुपू लागलो. युवराज ढमाले आपल्यापेक्षा मोठा होत आहे, ही ईर्ष्या त्यांच्या मनात असून, त्याच इर्षेतून मला संपवण्याची भाषा त्यांनी सुरु केली होती. गेल्या तीन वर्षात ते माझ्याशी बोललो नसल्याचे सांगतात. पण माझ्याकडे १ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेला पाच मिनिटांचा कॉल रेकॉर्ड आहे. त्यावरून काकडे हे खोटे बोलत असल्याचे सिद्ध होते. काकडे यांचे अनेक गुंडांशी संबंध असल्यामुळे त्याच भीतीतून मी दोन वर्षे तक्रार दिली नाही. परंतु, आता मला अधिकच असुरक्षित वाटल्यामुळे पोलिसांकडे धाव घेतली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था यावर माझा विश्वास आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जनतेसमोर सर्व सत्य यावे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना निवेदन देणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. माझे म्हणणे असे आहे की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून सत्य समोर आणावे. काकडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या फोनचे सर्व तपशील तपासावेत. त्यातून खरे काय ते समोर येईल," असेही ढमाले यांनी स्पष्ट केले.
ढमाले पुढे म्हणाले, "आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावा-बहिणीतील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. तीन वर्षांपासून राखी बांधून घेता आली नाही, याचे दुःख वाटते. माझ्या प्रगतीची ईर्षा करणारी माझीच बहीण आहे, याचे अधिक वाईट वाटते. आपल्या भावाच्या जीवावर उठण्याचा विचार करणाऱ्या बहिणीला ईश्वराने सद्बुद्धी द्यावी."