Breaking News

भाजपातील राष्ट्रवादीचे शिलेदार परतीच्या वाटेवर!

- पक्षप्रवक्ते नवाब मलिक यांचे संकेत

- शरद पवार घेणार लवकरच निर्णय

मुंबई/ विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या उलट भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार लवकरच राष्ट्रवादीत परत येणार असून, त्याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हे घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत.
नवाब मलिक ट्विट करत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच यावर लवकरच निर्णय घेऊन सार्वजनिक जाहीर केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्याचप्रमाणे राज्यात नोव्हेंबरमध्ये भाजपचे ’ऑपरेशन लोटस’ असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.