Breaking News

एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या, नाशिक जिल्ह्यात खळबळ !

नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील ...

नांदगाव (नाशिक)/ प्रतिनिधी : तालुक्यातील वाखारी शिवारात एकाच कुटुंबातील चौघांची धारदार शस्त्राने निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्या आर्थिक किंवा अनैतिक संबंधातून केल्या असाव्यात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

सविस्तर असे, की नांदगाव (जि. नाशिक) तालुक्यातील वाखारी शिवारातील जेऊर रोड परिसरात असणार्‍या वस्तीवर चव्हाण कुटुंबीय राहत होते. गुरूवारी रात्रीच्या वेळी समाधान आण्णा चव्हाण (३७) हे पत्नी भरताबाई समाधान चव्हाण (३२) मुलगा गणेश समाधान चव्हाण (६) आणि मुलगी आर्या समाधान चव्हाण (वय ४) यांच्या समवेत घराबाहेर रात्री झोपले होते. त्यावेळी ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी चव्हाण कुटुंबातील चौघांच्या मानेवर, डोक्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. यातच या चौघांचाही मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.  समाधान आण्णा चव्हाण यांचे घरे वाखारी गावापासून जेऊर रोडला एक किलोमीटर अंतरावर असून, त्यांच्या घराच्या आसपास १०० मीटर पर्यंत इतर कुणाचे घर नाही. शिवाय, घराशेजारी मका-बाजरीची शेती असल्याने दूरपर्यंत कोणी दिसत नाही. त्यामुळे रेकी करून रात्रीच्या अंधाराचे नियोजन करून हे खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक मालेगाव, नांदगाव पोलिस निरीक्षक व त्यांचा ताफा दाखल झाला. त्यांना काही अंतरावर रक्ताने माखलेला कुर्‍हाडीचा लाकडी दांडा मिळाला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.