Breaking News

कंटेन्मेंट झोनमधून होतेय खुलेआम वाहतूक ; प्रशासन करतेय काय ?

कंटेन्मेंट झोनमधून होतेय खुलेआम वाहतूक ; प्रशासन करतेय काय ?

मिरजगावच्या ग्रामस्थांचा संतप्त सवाल
कर्जत प्रतिनिधी :
मिरजगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना येथे नागरिकांकडून कोणतेच नियम पाळण्यात येत नाहीत. तर व्यापारी आपली दुकाने राजरोसपणे उघडी ठेवून शासनाने घालून दिलेले नियम पाळताना दिसत नाहीत. येथील कंटेन्मेंट झोन फक्त नावापुरतेच उरल्याने गावात तो चेष्टेचा विषय झाला आहेत. या झोनमध्ये पादचारी तसेच दुचाकीस्वारांची खुलेआम दळणवळण सुरू असताना प्रशासन नेमके करते काय ? हा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
मिरजगावमध्ये कोरोना हातपाय पसरताना दिसत आहेत. येथील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. गावामध्ये तयार करण्यात आलेले कंटेन्मेंट झोन फक्त नावापुरतेच आहेत. कंटेन्मेंट तयार करताना शासनाने घालून दिलेले नियम येथील प्रशासनाकडून पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने घालून दिलेले शंभर मीटरचे अंतराचे नियम पाळल्याचे दिसत नाही. कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून फक्त रस्त्यावर आडवे बांबू लावल्याचे दिसत आहेत. या बांबूखालून तसेच बाजूने पादचारी किंवा दुचाकीस्वारांची राजरोसपणे रहदारी सुरु असल्याचे दिसत आहे.
या प्रतिबंधित क्षेत्राकडे ग्रामपंचायत तसेच तालुका प्रशासनाकडून पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. मिरजगावमधील कंटेन्मेंट झोन तयार करताना या भागातील दुकानदारांचे हितसंबंध जोपासले गेले आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोनचे हे अंतर काही ठिकाणी दहा मीटर, पन्नास मीटरपर्यंत असे कमी जास्त करण्यात आलेले आहेत. त्यावरून मिरजगावमध्ये कोरोनाबाबत प्रशासन किती गंभीर आहे हे लक्षात येते.
येथील कंटेन्मेंट झोनमधील काही दुकानांना प्रशासनाने परवानगी दिली असल्याच्या थाटात ही दुकाने सुरू असल्याचे दिसत आहेत. मिरजगावमधील अनेकांना कोरोना आपल्या विळख्यात घेत असताना प्रशासनाची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे येथील कोरोनाची साखळी कशी तुटणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तालुका प्रशासनाची भूमिकाही लोकहिताची असताना दिसत नाही.