Breaking News

बेन स्टोक्सने ५ वर्षांपुर्वी टाकलेल्या 'त्या' एका चेंडूची जगाने घेतली दखल

World Cup 2019: New Zealand Christchurch born Ben Stokes become ...

 ७ ऑगस्ट २०१५ मध्ये नॉटिंगहॅम येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत, गोलंदाजीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना घडली होती.

इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटींमध्ये १० लाखावा चेंडू फेकण्यात आला. हा ऐतिहासिक चेंडू टाकण्याचा मान इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला मिळाला होता. कोणत्याही देशातील मैदानांवर १० लाख चेंडू टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.

या सामन्याआधी, हा विक्रमी चेंडू पूर्ण करण्यासाठी ७१५ चेंडू टाकणे आवश्यक होते. ऑस्ट्रेलिया आपल्या पहिल्या डावात अवघ्या १८.३ षटकात ६० धावांवर सर्वबाद झाला.‌ स्टुअर्ट ब्रॉडने अवघ्या १५ धावात ऑस्ट्रेलियाचे ८ गडी गारद केले होते. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ८५.२ षटकांचा सामना करत ३९१ धावा जमवल्या. सामन्यात ६२३ चेंडू टाकून झाले होते. विश्वविक्रमी चेंडूसाठी ९२ चेंडू बाकी होते.

स्टुअर्ट ब्रॉड व मार्क वूड यांनी गोलंदाजीची सुरुवात केली. मात्र, १० व्या षटकात स्टीवन फिनने वूडच्या जागी चेंडू हातात घेतला. दोघे चांगली गोलंदाजी करत असताना कर्णधार कुकने अचानक स्टुअर्ट ब्रॉडला गोलंदाजीवरून हटवले. डावाचे १४ वे षटक संपल्यानंतर आकडेवारी ९९९,९९२ अशी झाली होती. इतक्यात, स्टोक्सच्या जागी फिरकीपटू मोईन अली गोलंदाजीसाठी आला. विश्वविक्रमी चेंडू फिन टाकणार टाकणार हे जवळपास ठरलेच होते. मात्र, अलीचे षटक संपताच पुन्हा बेन स्टोक्स गोलंदाजीला आला. कर्णधाराने त्याची बाजू बदलली होती.

स्टोक्सने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर मैदानावरील स्क्रीनवर काही अक्षरे झळकली.

" पुढचा चेंडू इंग्लंडच्या मैदानांवरील कसोटी क्रिकेटमधील १० लाख वा चेंडू असेल. "

सर्व प्रेक्षक या ऐतिहासिक क्षणापासून अनभिज्ञ होते. स्टोक्स चेंडू टाकण्यासाठी धावू लागला आणि सभ्य इंग्लिश प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

स्टोक्सने चेंडू टाकला मात्र, या साधारण टप्प्याच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने शानदार कव्हर ड्राईव्ह मारला. प्रेक्षक काहीसे नाराज झाले. प्रेक्षक काही वेळ टाळ्या वाजवून शांत झाले. पण, जगभरातील आकडेतज्ञांसाठी ही एक पर्वणी ठरली.