Breaking News

रस्त्याचा प्रश्न सुटल्याने कणगरे कुटुंबियांचे उपोषण स्थगित

रस्त्याचा प्रश्न सुटल्याने कणगरे कुटुंबियांचे उपोषण स्थगित

नेवासा तालुका प्रतिनिधी - 
   दलीत वस्ती रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लावण्याची प्रक्रिया घोगरगाव ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केल्याने कणगरे कुटुंबीयांनी त्यांच्या सोमवारपासूनच्या आमरण उपोषण आंदोलनास स्थगिती दिली आहे. 
दोन शेतकऱ्यांच्या वादात घोगरगाव येथील टाकळीभान शिव रस्त्या लगतच्या कणगरे दलीत वस्ती रस्ता कामाचा बळी दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विनंत्या, अर्ज करूनही ग्रामपंचायत प्रशासन बधत नसल्याचे पाहून संतापलेल्या कणगरे कुटुंबीयांनी नेवासा पंचायत समितीसमोर सोमवार दि.१७ ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी याप्रकरणी एस.बी.सुपे (विस्तार अधिकारी - कृषी) यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी दिलेल्या अहवालात घोगरगाव ग्रामपंचायत प्रशासनाने सदर कणगरे वस्ती रस्त्याचे १ लाख २० हजार रुपये खर्चाचे मुरुमीकरण २०१९- २०.च्या १४ व्या वित्त आयोगातून करण्यासह या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी वरीष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मान्य केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गट विकास अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून कणगरे कुटुंबीयांनी त्यांचे उपोषण आंदोलन स्थगित केले आहे.