Breaking News

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे!

- ठाकरे सरकार बॅकफुटवर

- सीबीआयला संपूर्ण सहकार्याचे मुंबई पोलिसांना आदेश

नवी दिल्ली/ खास प्रतिनिधी 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेशही न्यायालयाने दिलेत. मंत्री आदित्य ठाकरे यांच्याभोवती संशय वाढल्यानंतर शिवसेनेने सीबीआय तपासाला विरोध केला होता. तसेच, महाराष्ट्र सरकारनेदेखील विरोधाची भूमिका घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार बॅकफुटवर गेले आहे. मुंबई पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला द्यायचे असून, महाराष्ट्र सरकारलाही निकालाचे पालन करावे लागेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 14 जून रोजी मुंबईच्या वाद्य्रातील राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. बिहारच्या पाटण्यात आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी करत सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे न्यायपीठाने मान्य केले. मुंबई पोलिस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे, असे न्यायपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणार्‍या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. बिहार पोलिसांची एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणार्‍या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे. त्यामुळे रियाची मागणीही न्यायपीठाने फेटाळून लावली. 


हा अन्यायाविरुद्धचा विजय : बिहारचे पोलिस महासंचालक

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आनंद व्यक्त केला. त्यांनी मुंबई पोलिसांचा तपास आणि पाटण्याच्या एसपीना क्वॉरन्टाईन करण्यावरही प्रश्‍न उपस्थित केले. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने सिद्ध झाले आहे की, बिहार पोलिसांनी काहीही चुकीचे केलेले नाही. हा अन्यायाविरुद्धचा विजय आहे. मला विश्‍वास आहे की सुशांतला न्याय मिळेल. बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीकाटिप्पणी करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही, असेही त्यांनी ठणकावले.


सत्यमेव जयते : पार्थ पवार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी अवघ्या दोन शब्दात प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार यांनी ’सत्यमेव जयते’ एवढीच पण सूचक ट्वीट केले.