Breaking News

अनेक ठिकाणी लालपरी प्रवाशांविना धावली!

- एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु


पुणे/ विशेष प्रतिनिधी 

राज्यात गुरुवारपासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. परंतु राज्यातील अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी एखाद-दुसरा प्रवासी एसटीमधून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारने गुरुवारपासून आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरु केल्यानंतर कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी बस सेवेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. गेल्या पाच महिन्यापासून एसटी बसची आंतरजिल्हा सेवा बंद होती, त्यामुळे बाहेर जिल्ह्यात जाणारे प्रवासी गर्दी करतील अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र गुरुवारी सकाळपासून एखादा प्रवासी वगळता प्रवाशांनी बस प्रवास टाळल्याचे दिसत आहे. जिल्ह्याबाहेर जाणार्‍या प्रवाशांना आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी असल्याचे चित्र आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात एक एसटी बस सोडण्यात आली होती. मात्र प्रवासी संख्या वाढल्यावर जादा बस सोडल्या जाणार आहेत.


ई-पासची गरज नाही

गणेशोत्सवानिमित्त आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.