Breaking News

India Corona Update: 31.06 लाख पैकी 23.38 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 75 टक्क्याहून अधिक !

 Coronavirus update: good news about corona recovery rate reaches ...

 देशात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आजवर 31 लाख रुग्णांपैकी 23.38 लाख रुग्ण बरे झाले आहेत. यासह देशाचा रिकव्हरी रेट वाढून 75.27 टक्के एवढा झाला आहे. गेल्या 24 तासांत 57 हजार 468 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 31 लाख 06 हजार 349 इतकी झाली आहे. यामध्ये 23 लाख 38 हजार 36 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 57 हजार 542 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोविड-19 रिकव्हरी रेट वाढून 75 टक्क्यांच्या पुढे गेला असून तो सध्या 75.27 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात दररोज 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होत आहेत. रविवारी (दि.23) तब्बल 56 हजार 863 रुग्णांनी कोरोनामुक्त झाले होते.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 3 कोटी 59 लाख 02 हजार 137 नमूण्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 6 लाख 09 हजार 917 चाचण्या या रविवारी (दि.23) रोजी करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असून गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल साडेचार लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. तर यादरम्यान 6 हजार 666 रुग्णांचा मृत्यूही झाला. परंतु देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या इतर देशांच्या तुलनेत मात्र कमी आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.85 टक्के एवढा आहे. देशात सध्या 22.88 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.