Breaking News

कंगनाविरोधात निदर्शनं; शिवसेना आमदार, महापौरांसह 12 जणांवर गुन्हा

 kangana ranaut news

औरंगाबाद : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK)केली आहे. कंगनाविरोधात शिवसेनेनं सोशल मीडियावर आक्रमक कॅम्पेन सुरू केलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडून कंगनाच्या मुंबईबाबत केलेल्या कथित वक्तव्याचा जोरदार निषेध वर्तवला जात आहे.

औरंगाबाद शहरात देखील शिवसेनेकडून कंगनाच्या वक्तव्याचा विरोधात निदर्शनं करण्यात आली. मात्र, शिवसेनेनं क्रांति चौक उड्डाणपुलाखाली केल्या आंदोलनाची परवानगी न घेतल्याप्रकरणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा समावेश आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावरून उफाळलेल्या वादानंतर अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांवरही अविश्वास दाखल केला होता. कंगनानं केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शुक्रवारी क्रांतिचौक उड्डाणपुला खाली जोडे मारो आंदोलन करीत शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. विनापरवानगी आंदोलन केले म्हणून क्रांतिचौक पोलीस ठाण्यात कलम 135 प्रमाणे शिवसेनेच्या आमदार, माजी महापौर, नगरसेवकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, कंगना रणौत ही येत्या 9 तारखेला मुंबईत येत आहे. तिला येऊ द्या. मुंबई एअरपोर्टवर तिचा शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेनेनं पुकारलं सोशल आंदोलन

दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेनेनं सोशल मीडियावर आक्रमक कॅम्पेन सुरू केलं आहे. शिवसेनेकडून वेगवेगळे आक्रमक पोस्टर तयार केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील राजकारण तीव्र झालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत   ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत  सर्व स्तरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही कंगनाविरोधात मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी निषेध केला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी POK शी मुंबईची तुलना करणार्‍या कंगनाविरोधात रस्त्यावर उतरतानाही दिसली. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्सच्या चौकशीवर कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली. यावर आता शिवसेनेकडून काही पोस्टर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 'ये डर होना चाहिए मुंबई व महाराष्ट्राचा नाद कोणी करू नये!', 'मुंबई POK वाटते तर... कंGOना' अशा शब्दात शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.