Breaking News

मुंबईत परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपाचार, 3 रुग्णालयांवर कारवाई

 

नवी मुंबई : मुंबईत कुठलीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशीतील तीन नामांकित रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या या काळ्या कारभाराची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेत, यातील एका रुग्णालयास 15 दिवस बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा  बंद ठेवण्याचे आदेश दिले, तर उर्वरित दोन रुग्णालयांस एक लाखाचा दंड ठोठावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई मनपाने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेत, 'ट्रेस, टेस्ट व ट्रिट' ही त्रिसूत्री राबविण्यावर भर दिला. या अनुषंगाने कोरोना रुग्णांवर लक्षणांनुसार योग्य उपचार व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयांकडून आयसीएमआर तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पण वाशीमध्ये ग्लोबल हेल्थ केअर कुन्नूरे हॉस्पिटल, क्रिटीकेअर सेंटर आणि पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या तीन रुग्णालयांत विनापरवानगी उपचार सुरू असल्याची बाब समोर आली.

कोरोना संसर्ग आणि रुग्णांची प्रकृती पाहता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या तीनही रुग्णालयांना नोटिशी बजावल्या होत्या. नोटिशीला वेळेत उत्तर न दिल्याने आयुक्तांनी पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा  15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. तर ग्लोबल हेल्थ केअर कुन्नूरे हॉस्पिटल आणि क्रिटी केअर सेंटर या रुग्णालयांका एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

रुग्णालयांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याआधी शासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. तसेच कोव्हिड रुग्णांवर उपचारासाठी आयसीएमआर व महाराष्ट्र शासनाने कार्यप्रणाली निश्चित केलेली असून, त्यानुसारच रुग्णालयांनी उपचार करणे गरचे आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा-1897 ची योग्य अंमलबजावणी करणेही रुग्णालयांस बंधनकारक आहे.

दरम्यान, परवानगी नसताना रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होतेय. परवानगी नसताना उपचार होत असतील, तर आयसीएमआरच्या गाईडलाईन्सची अंमलबजावनी होत असेल का? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. तसेच कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ होतोय, असा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.