Breaking News

पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

 

नागपूर :      टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. एका पत्रकराचा अशाप्रकारे मृत्यू ही दुर्दैवी आणि मनाला धक्का लावून जाणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पांडुरंग या चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे, अंतर्मुख करायला लावणारा आहे, पत्रकाराची परिस्थिती अशी असेल ती योग्य नाही, याबाबत मी प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

नागपुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना पसरतो आहे. त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर चिंता वाढविणारा आहे. मी पश्चिम महाराष्ट्राचा कोरोनासंदर्भात दौरा केला. टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं, असं फडणवीस यांनी सांगितलं. पूर्व विदर्भात पूर परिस्थितीने मोठं नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

      उपचाराअभावी पांडुरंग रायकर यांचं निधन कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे 'टीव्ही 9 मराठी'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.


पांडुरंग रायकर यांची कारकीर्द

पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी 'टीव्ही 9' च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.  

ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.