Breaking News

तेजस वारुळेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार जाहीर !

तेजस वारुळेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार जाहीर !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये तालुक्यातील न.पा. शाळा क्र.९ च्या उपक्रमशील शिक्षिका तेजस राजेंद्र वारुळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जून कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 
    तालुक्याच्या शैक्षणिक वर्तृळात सौ. वारुळे यांची उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळख आहे. प्रबोधन, अध्ययन आणि विकास ही वारुळे यांच्या कार्यपद्धतीची त्रिसूत्री राहिली आहे. पालकांचे प्रबोधन करून गरीब तसेच सामाजिक प्रवाहातील होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांकरीता बालरक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे.
    डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवले आहे. शैक्षणिक अध्ययनासाठी स्वतंत्र ब्लॉगची निर्मिती केली आहे. यू-ट्यूब माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मितीमुळे कोरोना संकटातही विद्यार्थी ज्ञानार्जनापासून अलिप्त राहिले नाही. 
पुरस्कारासाठीच्या निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. उपक्रमशील शिक्षिकेच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आल्याची भावना पालक-विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.