Breaking News

भारत-चीन सैनिकांत जोरदार गोळीबार

- मॉस्कोतील परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधीच तणाव

- सीमेवर दोन्ही बाजूने प्रत्येकी 50 हजार सैनिक तैनात



नवी दिल्ली/ वृत्तसंस्था 

भारत-चीन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा होत आहेत. अशातच मॉस्कोत भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. रिपोर्टनुसार, 10 सप्टेंबर रोजी मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्या भेटीआधी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनार्‍याजवळ गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना अत्यंत तीव्र आणि गंभीर असल्याचे समोर आले आहे.

पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनार्‍याजवळील एलएसीवर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा गोळीबार करण्यात आला होता. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या एलएसीजवळ 100 ते 200 गोळ्यांचे राऊंड फायर करण्यात आले. परंतु, ही फायरिंग एकमेकांवर न करता हवेत करण्यात आली असल्याचीही माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचे जवळपास 50 हजार सैनिक पूर्व लडाखजवळ असलेल्या एलएसीवर तैनात आहेत. भारतानेही मिरर-डिप्लोयमेंट करत, चीनच्या बरोबरीने सैन्य एलएसीवर तैनात केले आहे. दरम्यान, दोन देशांमध्ये पार पडलेल्या ब्रिगेडियर स्तराच्या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्यामुळे येत्या काही दिवसांत कोअर कमांडर स्तराची बैठक बोलावण्यात येणार आहे. भारत-चीन सीमा वाद हा गंभीर प्रश्‍न आहे. दोन्ही देश शांततेत हा प्रश्‍न मिटवण्यावर सहमत आहेत. केवळ शांततापूर्ण संवादच या वादाचे निराकरण करेल. चीनने अनेक वेळा एलएसीवर स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या सैनिकांनी त्यांना यात सफल होऊ दिले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. ते लोकसभेत बोलत होते. चीनने लडाखमधील सुमारे 38 हजार चौरस किलोमीटर जागेवर अनधिकृत कब्जा केला आहे, याची सर्वांना माहिती आहे. तसेच 1963 मध्ये तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पीओकेची 5180 चौरस किलोमीटरची जमीन बेकायदेशीरपणेचीनला दिली, असे राजनाथ सिंह म्हणाले.

----------------------