Breaking News

कोरोना झालेल्या रुग्णाच्या उपचारासाठी बेड नाही, पुण्यातील कोव्हिड परिस्थिती विदारक !

 Man with coronavirus-like symptoms admitted to Nashik hospital- The New  Indian Express

पुणे : पुण्यातील कोव्हिड परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. नुकतंच पुण्यातील कोरोना स्थितीचे भीषण वास्तव समोर आलं आहे. कोरोना झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात बेडचं मिळत नसल्याचे समोर आलं आहे. जवळपास सकाळपासून या रुग्णाची रुग्णालयात दाखल करण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र अद्याप त्यांना बेडच मिळालेला नाही. पुण्यातील या आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव 'टीव्ही 9 मराठी'च्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

मोठा गाजावाजा करत सुरु झालेलं पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. जम्बो कोव्हिड सेंटरच्या बाहेर एक कोरोना रुग्ण दोन तास रुग्णवाहिकेतच तात्कळत होता. मात्र त्याला कोव्हिड सेंटरमध्ये प्रवेशच मिळाला नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या शोधात वणवण सुरुच आहे.

कोव्हिड पॉझिटिव्ह असणाऱ्या वडिलांना घेऊन एक मुलगा रुग्णालयाच्या दारोदार फिरत आहे. आज सकाळपासून तो पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण कुठेही बेड मिळत नाही. त्यामुळे आपल्या बापाच्या जिवासाठी लेकराची तळमळ सुरु आहे.

पुण्यातील कोरोना स्थितीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. यात अनेक निर्णय घेतले गेले. मात्र तरीही पुण्यातील परिस्थिती जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे रुग्णांना बेड मिळत नाही. त्यामुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्था कोव्हिड रुग्णांसाठी सर्वार्थाने अपुरी पडत आहे.

कोव्हिडसाठी उभारण्यात आलेले जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करुन घेणे बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत संपूर्ण व्यवस्था होत नाही, तोपर्यंत रुग्ण न घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तर दुसरीकडे रुग्णांसाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.