Breaking News

धक्कादायक! पोलिस अधिकार्‍याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार

- अहमदनगर पोलिस दलातील घटना

- पोलिस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

- गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

अहमदनगर/ प्रतिनिधी

नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलिस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल झाला आहे. विकास वाघ सध्या फरार झालेला असून, अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी खटाटोप करत आहे. 

2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलिस ठाण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणीशी विकास वाघ याने ओळख वाढवली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. ही माझी मुलगी आहे असे सांगत जवळीक वाढवली आणि नंतर घरी जाऊन तिथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. याबाबत पीडित तरूणीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच ’ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील’ अशी धमकी दिली. त्यानंतर विकास वाघ याने पीडितेवर वेळोवेळी कधी हॉटेल तर कधी कोतवाली पोलिस निरीक्षकाच्या निवासस्थानी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गर्भपात केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब विकास वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली. तसेच तिच्या कोर्‍या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षर्‍या घेतल्या आहेत. त्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून विकास वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वाघ गुन्हा दाखल होताच फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

------------------