- विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलने मुंबई/ प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभू...
- विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलने
मुंबई/ प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात आले आहे. समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन होणार नाही. विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलन होतील. तसेच बंद पुकारले जातील. येत्या 21 सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. तर मुंबईत 20 सप्टेंबरला ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे, असे सांगितले होते. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच येत्या 17 सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत. दरम्यान, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करु, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही. सरकार जनतेच्या सोबत आहे. सरकार तुमच्यासमोर आहे. आरक्षणाचा विषय हा सरकारतर्फे पॉझिटिव्ह आहे. सत्तेत बसल्यानंतर आम्ही एकमताने ठराव पारित करत या कायद्याला समर्थन दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर कायदेशीर बाबींना तोडगा काढण्यासाठी या बैठक घेण्यात आली होती.