Breaking News

जायकवाडीच्या पाण्याने असंपादित क्षेत्राचे मोठे नुकसान !

जायकवाडीच्या पाण्याने असंपादित क्षेत्राचे मोठे नुकसान
--------------
सभापती डॉ. क्षितिज घुले - जायकवाडी प्राधिकरणला शेतक-यांसमवेत दिले निवेदन.


घोटण/प्रतिनिधी:
जायकवाडी जलाशयाचे पाणी असंपादित जमिन हद्दीत शिरून हजारो हेक्टर क्षेत्राचे पिक सलग दुसऱ्यांदा पाण्यात गेले असून काठालगतचा शेतकरी हतबल झालेला आहे.मागील वर्षी पंचनामे होऊन ही नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही व अजूनही पंचनामे करण्यास सुरुवात झाली नाही. जायकवाडी जलाशयाच्या पाण्यामुळे हि शेतक-यांवर परीस्थिती ओढावली असल्याने शेतक-यांचे झालेले नुकसान व शेतक-यांना भरपाई करून देण्याची जबाबदारी जायकवाडी प्राधिकरण आणि शासनाची आहे. असे स्पष्ट मत जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेंद्र काळे यांच्याशी चर्चा करताना शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले पाटील यांनी व्यक्त केले. पैठण येथील कार्यालयात अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांच्याशी नुकसान ग्रस्त शेतक-यांसमवेत सभापती डॉ .घुले यांनी भेट घेतली. यावेळी 2019 मध्ये नुकसान झालेल्या पिकांची रक्कम शेतकऱ्यांना आजपर्यंत न मिळाल्याबद्दल व चालू वर्षी ही जलाशयाचे पाणी असंपादित क्षेत्रात शिरल्यामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून मागील व आताची नुकसान भरपाई त्वरित मिळणे बाबत सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी सूचना केल्या आहेत.या वर्षी सन 2020 मध्येही जायकवाडी जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांच्या असंपादित क्षेत्रात शिरल्यामुळे शेवगाव तालुक्यातील क-हेटाकळी ते दहिगाव ने पर्यंतच्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कांदा, तूर, भुईमूग, ऊस,कपाशी,बाजरी आदि. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी आपल्या विभागामार्फत शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई मिळावी दोन्ही बाबीचा गांभीर्याने विचारात करून त्याबाबत तातडीची कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर एरंडगाव पं .समीती सदस्य मंगेश थोरात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अॅड अनिल मडके, बोडखे सरपंच नानासाहेब वेताळ, एरंडगाव समसुद सरपंच संतोष धस, एरंडगाव भागवत सरपंच गोकुळ भागवत, खान पिंपरी सरपंच संतोष पावसे ,जायकवाडी समिती समन्वयक संतोष आडकीत्ते, गोविंद मुंगसे, मकरंद बारगुजे, भाऊराव माळवदे, संतोष शेटे, अशोक भागवत, मधुकर आवारे आदींसह नुकसानग्रस्त शेतक-यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदन प्रती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  ,ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ,  जिल्हा अधिकारी कार्यालय अहमदनगर ,तहसीलदार शेवगाव यांना देण्यात आल्या आहेत. तर मागील वर्षीची नुकसान भरपाई शेतक-यांच्या खाती वर्ग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सध्या असंपादित जमिनीत शिरलेल्या पाण्यातील पिकाचे पंचनामे जायकवाडी प्राधिकरण व अहमदनगर महसूल विभाग संयुक्तपणे पंचनामे करणार असल्याचे जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेंद्र काळे यांनी निवेदन कर्त्या शेतक-यांना आश्वासन दिले आहे.