Breaking News

परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान !परभणी । परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके हातची गेल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. मूग उडीद या पिकानंतर आता सोयाबीन पीकही हातचे जात असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पाणी आले आहे. यातच जायकवाडी लोअर दुधना व येलदरी ही धरणे भरल्याने या धरणातून विसर्ग केला जात आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना याचा फटका बसला आहे. गोदावरीसह इतर नद्या दुथडी वाहत असल्याने पाणी शेतातही शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सततच्या पावसामुळे याआधीच उडीद व मुगाला फटका बसला असतानाच, आता सोयाबीनला सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके पाण्यामुळे गेल्याने शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होऊ लागली आहे.