Breaking News

के.के.रेंज प्रश्नी शरद पवार पुढील आठवड्यात संरक्षण मंत्र्यांची घेणार भेट !

के.के.रेंज प्रश्नी शरद पवार पुढील आठवड्यात संरक्षण मंत्र्यांची घेणार भेट !
-----------
आ.लंके यांनी के.के. बाधीतांची भूमिका  पवारांकडे मांडली !
------------
शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे पवारांनी दिले आश्वासन !


पारनेर प्रतिनिधी -
     अहमदनगर जिल्ह्यात तीन तालुक्यात के.के. रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत.दरम्यान आपल्या पिकत्या जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यात शेतकऱ्यांनी मनाई केली आहे. याविरोधात सर्व गावकरी एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्यातील आघाडी सरकार संबंधित शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील अशी ग्वाही पवार यांनी दिली.
       त्याच बरोबर या प्रश्नाबाबत  पुढील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संरक्षण खात्याने ताब्यात घेतलेल्या आहेत . यापुढील काळात सुमारे २५ हजार हेक्टर भूसंपादन करून विस्तारीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या याला राहुरी तालुक्यातील १७, नगर तालुक्यातील ५ व पारनेर तालुक्यातील ५ गावांनी विरोध केला आहे. या विस्तारीकरणामुळे ही २७ गावे बाधित होणार असल्याने या अन्यायकारक भूसंपादनाला विरोध करण्यात आला आहे. 
         विळद घाटाजवळील खारे कर्जुने परिसरात लष्कराचे के.के.रेंज हे सराव क्षेत्र आहे.तेथे सैनिकांना रणगाडा प्रशिक्षण दिले जाते. नगर,पारनेर व राहुरी या तिन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या क्षेत्राचे विस्तारीकरण होणार आहे.मात्र या विस्तारी करणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
१९४१ मध्ये लष्करी सरावासाठी म्हणून के. के. रेंज सुरू केले. त्यानंतर १९५६ मध्ये संरक्षण खात्याने सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र कवडीमोल भावाने संपादित केले.आताही २५ हजार हेक्टर क्षेत्र नव्याने संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे पारनेर,नगर आणि राहुरीतील २७ गावे व त्यामध्ये राहणारे ग्रामस्थ विस्थापित होणार आहेत.नव्याने केल्या जाणाऱ्या या भूसंपादनाला  तीव्र विरोध होत आहे.  पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे.या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना साकडे  घालण्यात आलेले आहे. बुधवारी आ.लंके यांनी या विषयी पुन्हा मुंबई येथे पवार यांची भेट घेतली.के.के. रेंज विस्तारी करणासाठी विरोध असताना संरक्षण विभागा कडून सुरू असलेल्या हालचालीमुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान याप्रश्नी आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून असा शब्द पवार यांनी दिला आहे. 
        पुढील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही शरद पवार यांनी आमदार निलेश लंके यांना दिली. यावेळी वनकुटे चे सरपंच अॅड राहुल झावरे, युवा नेते विजु औटी,निघोज चे सरपंच ठकाराम लंके,सुनिल कोकरे उपस्थित होते.

 स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही के.के. रेंज विस्तारी करणासाठी जमीन संपादनाचा घाट घालण्यात आलेला आहे.ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.त्या अनुषंगाने आम्ही या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना साकडे घातले आहे.याबाबत संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संबंधितांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही त्यांच्याकडून आम्हाला देण्यात आली आहे.दरम्यान पुढील आठवड्यात संरक्षण मंत्र्यांची याबाबत भेट घेतली जाणार आहे.
------------
आ.निलेश लंके