Breaking News

सुशांत प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले?

सीबीआयच्या माध्यमातून पवारांचा केंद्रावर निशाणा!

- आठवलेंचा एक तरी आमदार, खासदार निवडून आला का?

- दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने खासदार; त्यांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींकडे प्रयत्न करावेत!


पंढरपूर/ विशेष प्रतिनिधी 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी उपस्थित करत, सीबीआयच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारला चांगलेच फटकारले. पवार मंगळवारी पंढरपूर दौर्‍यावर होते. या दौर्‍यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. तसेच, शेतकर्‍यांच्या भल्यासाठी शरद पवार यांनी एनडीएत यावे. शरद पवार आले तर केंद्रातील सत्तेत वाटा मिळेल, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केले होते. त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत, आठवलेंचा एक देखील आमदार अथवा खासदार आहे का? असा सवाल करत खिल्ली उडवली.

या पत्रकार परिषदेत पवारांनी सुशांतप्रकरणी सीबीआयला टोला लगावला. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले. दरम्यान, सुशांतची आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दर्शवला होता. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले होते. जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आता वेगळ्याच दिशेत जात असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच, देश पातळीवर कृषी विधेयकाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मत पवारांनी यावेळी व्यक्त केले. शिवाय, दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्लाही शरद पवारांनी दिला. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात देखील वक्तव्य केले. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढायचे कारण नाही. राऊतांनी पहिली मुलाखात माझी घेतली. त्याच मुलाखातीत त्यांनी मला सांगितले की, पुढची मुलाखात मी उद्धव ठाकरे आणि नंतर भाजप नेत्यांची मुलाखात घेणार आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. सध्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सगळ्या प्रकरणात पुढाकार घेत आहेत. याविशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोणीही गंभीरतेने घेत नाही. राज्यसभेतही आणि बाहेरही त्यांचा एकही आमदार नाही, खासदार नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, या सरकारला  कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास शरद पवारांनी या पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केला.


राज्यात मध्यावधीची शक्यता नाही!

शिवसेना खासदार संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या दोघांच्या मुलखतीचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. तसेच, त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मध्यावधी निवडणुकीचा दावा फेटाळून लावला. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही, असेही पवार म्हणाले.